नाशिक – शैक्षणिक वर्षाचा आरंभ अवघ्या काही दिवसात होणार असतांना शैक्षणिक वर्षातील साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत लगबग वाढली आहे. काही शाळांमधून शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकातुन खरेदी करण्याची सक्ती केली जात असतांना मेनरोडसह अन्य भागात मात्र पालक, विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे.
राज्य शासनाच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अनुदानित सर्व शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तक वितरीत करण्यात येतात. यंदाही शाळेचा पहिला दिवस उत्साहात जावा, यासाठी नियोजन सुरू आहे. शाळेच्या प्रवेशोत्सवात पहिलं पाऊल, औक्षण, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप यासह शाळेचे आवार आकर्षक सजविण्यासाठी सुक्ष्म नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, मालेगाव, येवलासह अन्य तालुक्यांमध्ये पाठ्यपुस्तक वितरण करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे, शाळेचा पहिला दिवस उत्साहात जाण्यासाठी नवीन दप्तर, वह्या, पुस्तके, जेवणाचा डबा अशी नव्याची नवलाई पाल्याला अनुभवता यावी यासाठी पालकांकडून खरेदीला प्राधान्य देण्याचे नियोजन सुरू आहे. या अनुषंगाने नवीन शैक्षणिक वर्षाकरिता साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात शालेय साहित्य खरेदीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची मेनरोड, रविवार कारंजा यासह अन्य भागात मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे. पुस्तके, वह्या, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत शैक्षणिक साहित्यांच्या किंमतीत १० ते १५ टक्के वाढ झाल्याने पालकांच्या महिन्याच्या अंदाजपत्रकावर याचा काहीसा परिणाम झालेला दिसून येत आहे.
यंदा बाजारात पुनर्वापर केलेल्या कागदापासून बनवलेल्या वह्यांची मागणी वाढली आहे. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी टॅब, सायंटिफिक कॅलक्युलेटर आणि शैक्षणिक ॲप्सचे वर्गणीदार होण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. लहान मुलांमध्ये कार्टूनचे छोटा भीम, बार्बी, ॲव्हेंजर्स हे पात्र असलेले दप्तर, पाण्याची बाटली आणि कंपास पेटी खरेदी करण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. याविषयी विघ्नहर स्टेशनरी मार्टचे अमोल सोमवंशी यांनी माहिती दिली. शाळा सुरू होण्यास आठवडाभर अवधी आहे. मात्र पाऊस तसेच वेळेवर घाई नको म्हणून पालक- विद्यार्थी यांनी वह्या पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी करण्यास सुरूवात केल्याचे त्यांनी सांगितले. अगदी पहिलीपासून दहावीपर्यंत प्रती इयत्ता एक डझनहून अधिक वह्यांची खरेदी होत असून त्याअनुषंगाने काही सवलती देण्यात येत आहेत. शाळांकडून शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती केल्याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याची तक्रार सोमवंशी यांनी केली.
बाजारपेठेत सध्या मेनरोड, शालीमार, रविवार कारंजा या भागात व्यावसायिकांनी दप्तर, पाण्याच्या बाटल्या, जेवणाचे डबे, रेनकोट, छत्री यांसह वेगवेगळी दुकाने थाटली आहेत. प्लास्टिक वापरावर बंदी असली तरी पालकांकडून किंमतीचा तसेच मुलांच्या वस्तु हरविण्याच्या सवयी पाहता प्लास्टिक सामान खरेदीवर भर दिला जात आहे. काहींकडून स्टिलच्या बाटल्या, डबे याला प्राधान्य दिले जात आहे.
