पोलिसांचे कामकाज विद्यार्थ्यांनीही अनुभवले

महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने ‘रायिझग डे’ साजरा केला जातो

एखादा गुन्हा घडल्यावर तक्रार कशी नोंदविली जाते, पोलीस गस्त घालतात म्हणजे नेमके काय करतात, ‘बीट मार्शल’ म्हणजे काय आणि ते काय काम करतात.. अशा एकापाठोपाठ एक बालसुलभ प्रश्नांची सरबत्ती शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये झाली आणि त्यांचे निराकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावे लागले. हा विषय केवळ प्रश्नांवर सुटला नाही, तर बच्चे कंपनीने पोलिसांकडून वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचीही स्वत: हाताळणी करून पाहिली. निमित्त होते, ‘रायझिंग डे’चे. पोलीस ठाणे व एकंदर पोलीस दलाविषयी सर्वसामान्यांच्या मनात असणारी अनामिक भीती दूर करून नागरिक व पोलीस यांच्यात सुसंवादाचा पूल बांधण्याचा प्रयत्न शहर पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलीस यंत्रणेचे कामकाज, त्यांच्याविषयी असणारे गैरसमज दूर व्हावेत, जनमानसात या दलाची प्रतिमा उजळावी, नागरिक तसेच पोलीस यांच्यातील संवादाची दरी भरून निघावी, यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने ‘रायिझग डे’ साजरा केला जातो. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने यानिमित्त ८ जानेवारीपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिमंडल एक व दोनच्या परिक्षेत्रात ‘रायझिंग डे’चे औचित्य साधत अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. शालेय विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यात भेट हा त्याचाच एक भाग. विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी असणारी भीती कमी व्हावी, भविष्यात त्यांनी पोलिसांचे उत्तम मित्र व्हावे, यासाठी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे चमू पोलीस ठाण्यात भेट देऊन कामकाजाची पाहणी करत आहे. एखादा गुन्हा घडला तर त्याची तक्रार कशी नोंदविली जाते इथपासून ते पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते इथपर्यंतची माहिती विद्यार्थी घेत आहेत. पोलिसांचे दैनंदिन कामकाज कसे चालते, दैनंदिन कामकाजातील सांकेतिक शब्दांचा अर्थ, गस्त घालणे म्हणजे नेमके काय केले जाते, आदी प्रश्नांची उकलही त्यांनी करवून घेतली. उकल करण्यासोबत विद्यार्थ्यांची जवानांकडील शस्त्रांची हाताळणीही केली.
पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या शंकाचे समाधान केले. एखादा गुन्हा आपल्या सभोवताली घडत असताना त्याचा प्रतिकार कसा करावा किंवा पोलिसांपर्यंत ती माहिती कशी द्यावी, आप्तकालीन परिस्थिती कशी हाताळावी, याविषयी मुलांना समजेल अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच नागरिक आणि पोलीस यांच्यातील हरवलेला संवाद पूर्ववत व्हावा यासाठी वेगवेगळ्या वस्ती, चौकात जात स्थानिक नागरिकांशी संवाद साधला जात आहे. यामध्ये कोणी टवाळखोर त्रास देत असेल, नागरिकांना काही उपद्रव असेल, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी मंडळी एकत्र येत असतील तर अशी माहिती घेऊन कारवाई तसेच नागरिकांकडून पोलिसांच्या असणाऱ्या अपेक्षा यावर चर्चा होत आहे. ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचाही विचार केला जात आहे. नोकरदार महिला, विद्यार्थिनी, गृहिणी यांना टवाळखोरांचा सामना करावा लागतो का, तसेच घरातही कौटुंबिक वादातून लक्ष्य केले जाते का, याबाबतची छाननी केली जात आहे. एकंदरीत नागरिकांना सुरक्षित वातावरण कसे लाभेल या दृष्टीने काय करता येईल, याची पडताळणी ‘रायझिंग डे’च्या माध्यमातून सुरू आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा भार ज्यांच्या शिरावर आहे, त्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण असतो. या स्थितीत शारीरिक तसेच मानसिक स्तरावर सक्षम व सुदृढ राहावे यासाठी त्यांची आरोग्य तपासणी विविध पोलीस ठाण्यांत केली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: School students experienced how police works in nashik

Next Story
नाशिकच्या गुंडास धुळ्यात अटक
ताज्या बातम्या