राज्य शिक्षण संस्था महामंडळाची मागणी

नाशिक : दोन वर्षांपासून करोना प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा तत्काळ सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. येथील  के. जे. मेहता शाळेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील, नाशिक विभाग अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, उपाध्यक्ष प्रवीण जोशी, बाळासाहेब पाटील , गं. पा. माने आणि इतर संस्थाचालक उपस्थित होते.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याच्या कारणाने सलग दोन वर्षांपासून खासगी आणि सरकारी शाळा बंद आहेत. या शाळा सुरू करण्याबाबत शासनाने हिरवा कंदील दाखवावा, शाळेत विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे की नाही, हा ऐच्छिक प्रश्न असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी चार सप्टेंबरपासून शाळा सुरू होतील असे जाहीर केले होते. परंतु, करोना महामारी आणि राजकारणातील ज्येष्ठ मंडळींमुळे तो निर्णयदेखील हवेतच राहिला आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी त्याचप्रमाणे माझी संस्था, माझी जबाबदारी असे आव्हान संस्थाचालकांनी स्वीकारण्याचे ठरिवले आहे. तसे लेखी स्वरूपात शिक्षण विभागाला कळवले आहे, परंतु, अजूनही शाळा सुरू करण्यासाठी शासन निर्णय घेत नसल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्याार्थ्यांना एकटेपणा जाणवू लागला आहे. ऑनलाइन शिक्षण प्रभावी नाही. ही बाब गंभीर असून ठरावीक दिवस शाळा सुरू करायला पाहिजे, असे शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शासन दरबारी म्हणणे मांडले असल्याचे महामंडळाने सांगितले.  करोना काळात शाळा, महाविद्याालय यांनी घ्यावयाच्या खबरदारीसाठी लागणारा पैसा किंवा वेतनेतर अनुदान जिल्हा परिषद, नगरपालिका शाळांना भरभरून देत आहे. परंतु, खासगी संस्थांना हे पैसे देण्याचे जाणीवपूर्वक टाळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शाळा सुरू केल्यास आठवडय़ातून दोन ते तीन दिवस चार तासांसाठी विद्याार्थ्यांना शाळेत बोलावले जाईल. उर्वरित शिक्षण ऑनलाइन पद्धतीने दिले जाईल. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर करोनाबाबतच्या शासनाच्या नियमाचे पूर्णपणे पालन केले जाईल. शिक्षकांची नियुक्ती करणे हा अधिकार संस्थाचालकांचा असल्याचे न्यायालयाने वेळोवेळी मान्य केले आहे, तसे आदेश दिले आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जन्मशताब्दी आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सुवर्ण महोत्सव १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे साजरे केले जाणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.