मालेगाव: मालेगाव महानगरपालिकेच्या राजकारणाने आता वेग घेतला आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ‘सेक्युलर फ्रंट’ या आघाडीने आपले पत्ते उघड केले असून, सोमवारी मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या आघाडीतर्फे महापौर पदासाठी नसरीन बानो खालीद शेख (इस्लाम पक्ष) आणि उपमहापौर पदासाठी शान-ए-हिंद (समाजवादी पार्टी) यांच्या नावावर अपेक्षेप्रमाणे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. बड्या नेत्यांच्या उपस्थितीत या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
८४ जागा असलेल्या महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षाला सर्वाधिक ३५ जागा मिळाल्या आहेत. एमआयएम व शिवसेना शिंदे गटाला अनुक्रमे २१ व १८ जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पार्टी,काँग्रेस व भाजपला अनुक्रमे ५,३ व २ जागा मिळाल्या आहेत. इस्लाम व समाजवादी पार्टीने सेक्युलर फ्रंट अशी आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. ४० संख्याबळ झालेल्या आघाडीला बहुमतासाठी ३ जागा कमी पडत होत्या.
उपमहापौर पदाचा तिढा
काँग्रेसने पाठिंबा देऊ केल्याने आघाडीचे सत्ता समीकरण जुळवणे सुलभ झाले. परंतु,त्याबदल्यात काँग्रेसने उपमहापौर पदासाठी आग्रह धरला. तर समाजवादी पार्टी उपमहापौर पदावरील दावा सोडण्यास राजी नव्हती. दोन्ही पक्षांनी उपमहापौर पदासाठी आग्रह धरल्याने हा तिढा सोडवणे सेक्युलर फ्रंटसाठी आव्हान होते. अखेरीस समाजवादी पार्टीकडेच हे पद देण्यावर एकमत झाले. त्यानुसार सेक्युलर फ्रंटच्या वतीने शक्तीप्रदर्शन करत महापौर व उपमहापौर पदांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी इस्लाम पक्ष, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा मोठा राबता पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांच्या नावाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे पूर्णविराम मिळाला आहे. यावेळी महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
बहुमताचा दावा
दरम्यान,आमच्याकडे बहुमत गाठण्यासाठी आवश्यक ते संख्याबळ असून ७ फेब्रुवारी रोजी आमचाच विजय निश्चित आहे,असा विश्वास इस्लाम पक्षाचे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख यांनी व्यक्त केला आहे. सेक्युलर फ्रंटने आपले उमेदवार रिंगणात उतरवल्यानंतर एमआयएम व शिवसेना शिंदे गट हे विरोधी पक्ष काय पावले उचलणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. ३ फेब्रुवारीला दुपारी २ वाजेपर्यंत महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि इस्लाम पक्ष एकत्र आल्यामुळे सेक्युलर फ्रंटला जादुई आकडा गाठणे सहज शक्य होईल,अशी शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपची भूमिका नक्की काय?
दोन सदस्य असणाऱ्या भाजपने तीन सदस्य असलेल्या काँग्रेस सोबत स्वतंत्र गट स्थापन केला आहे. काँग्रेसचे एजाज बेग हे भारतीय विकास आघाडी या नावाने स्थापन झालेल्या या गटाचे नेते आहेत. या गटातील काँग्रेससह भाजपने देखील पाठिंबा दिल्यास सेक्युलर फ्रंटचे संख्याबळ ४५ पर्यंत जाऊ शकते. सोमवारी सेक्युलर फ्रंटच्या महापौर,उपमहापौर पदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना काँग्रेसचे महानगरप्रमुख एजाज बेग हे उपस्थित होते. भाजपचे मात्र कुणीही यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत भाजप सेक्युलर फ्रंटला पाठिंबा देईल की, तटस्थ राहण्याची भूमिका निभावणार,याविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे.

