scorecardresearch

द्राक्ष शिवार खरेदीला ‘सुरक्षा’: तपशील संकलित होणार; उत्पादकांची फसवणूक रोखण्यासाठी मदत वाहिनी

द्राक्ष हंगामात उत्पादकांची फसवणूक रोखण्यासाठी प्रभावी ठरणारी योजना आखली जात असून शिवार खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती पोलीस पाटलांच्या मदतीने घेतली जाणार आहे.

नाशिक: द्राक्ष हंगामात उत्पादकांची फसवणूक रोखण्यासाठी प्रभावी ठरणारी योजना आखली जात असून शिवार खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती पोलीस पाटलांच्या मदतीने घेतली जाणार आहे. संबंधितावर काही गुन्हे दाखल आहेत की नाही, याची पडताळणी केली जाईल. तसेच द्राक्ष उत्पादकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी लवकरच मदत वाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे.
द्राक्ष खरेदी व्यवहारात आजवर अनेक उत्पादकांची कोटय़वधींची फसवणूक झाली आहे. मध्यंतरी पोलिसांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबविली होती. त्या अंतर्गत गुन्हे दाखल करत अनेक व्यापाऱ्यांवर कारवाई केली. अनेक शेतकऱ्यांची रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले. आता परराज्यातील व्यापाऱ्यांना फसवणूक करण्याची संधी मिळणार नाही अशी व्यवस्था करण्याचा विचार होत आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात द्राक्ष उत्पादकांच्या होणाऱ्या फसवणुकीबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्यासह कृषी व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. द्राक्ष विक्रीचे व्यवहार मुख्यत्वे तोंडी होतात. त्यास लिखीत स्वरुप नसते. परराज्यातील व्यापारी दलालामार्फत द्राक्ष खरेदी करतात. प्रत्यक्ष तो प्रत्यक्ष सहभागी होत नाही. परिणामी, फसवणूक झाल्यास संबंधित व्यापारी सहभागी असल्याचे पुरावे मिळत नसल्याचा मुद्दा मांडला गेला. ही फसवणूक टाळण्यासाठी विशेष आराखडा तयार केला जात असून तक्रारींसाठी मदत वाहिनी कार्यान्वित केली जाणार असल्याचे डॉ. पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
चालू हंगामात द्राक्ष व्यवहारात फसवणूक रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नरत आहे. द्राक्षबागा अधिक असलेल्या भागात माल विक्री करताना काळजी घेण्याबाबत आवाहन करणारे फलक पोलीस यंत्रणेकडून लावले गेले. द्राक्ष खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच बँक खात्याचा सविस्तर तपशिल शेतकऱ्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे. ज्या व्यापाऱ्यासोबत व्यवहार केले जातील, त्याच्या बँक खात्यासंबंधी सिबील अहवाल तपासून घेता येईल. त्यातून धनादेश न वटण्याचे प्रमाण जास्त असल्यास अशा व्यापाऱ्यांना द्राक्ष माल देऊ नये. व्यापाऱ्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेबाबतची कागदपत्रे शक्य असल्यास प्राप्त करून घ्यावी. काही व्यापारी जास्त भावाचे प्रलोभन दाखवितात. त्यास बळी पडून फसवणुकीचे प्रकार घडतात. असे प्रकार रोखण्यासाठी मदतवाहिनी सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, गावोगावी शिवार खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांचा तपशील जमवण्याचे काम पोलीस पाटील यांच्या सहकार्याने केले जाणार आहे. पोलीस पाटील व्यापाऱ्यांचा तपशील स्थानिक पोलीस ठाण्यास देतील. संबंधित व्यापाऱ्यावर काही गुन्हे आहेत का, याची माहिती घेतली जाईल. या माध्यमातून व्यापाऱ्याची शेतकऱ्यांना ओळख होण्यास हातभार लागणार आहे. द्राक्ष व्यवहारांवर पोलीस यंत्रणा पोलीस पाटील यांच्या समन्वयाने लक्ष ठेवले जाईल, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Security grape field purchase details compiled helpline prevent manufacturer fraud police collector office amy

ताज्या बातम्या