नाशिक – तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांसह इतरांनी ज्याच्या मंदिरात हजेरी लावली आहे, अशा सिन्नर तालुक्यातील अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ यास एका बलात्कार प्रकरणात बुधवारी पहाटे नाशिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले आहेत.
.
अशोक खरात हा भविष्य सांगत असल्याने त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून काही विधीच्या नावाखाली तक्रारदाराचा विश्वास संपादन करून त्याने संबंधित महिलेला ऑफिसमध्ये बोलवित गुंगीकारक पदार्थ खायला दिल्यानंतर अत्याचार केल्याचे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे. २०२२ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू होता, असे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांनी संशयित अशोक खरातविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. याअंतर्गत बुधवारी पहाटे गुन्हे शाखेने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ असून प्रसिध्द महिला, सेलिब्रिटी संदर्भात काही व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येते, पोलीस तपासात अजूनही काही आक्षेपार्ह गोष्टी पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव हे छोटेसे गाव आहे. या गावातील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. श्री शिवलिका संस्थानची त्याने स्थापना केली आहे, या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर असल्याचे सांगितले जाते. खरात अंकशास्त्रज्ञ जाणून आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात अधिक चर्चेत आला. कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. खरातने ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) नावाच्या विज्ञान शाखेचा अभ्यास केला आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधिताला कठोर शिक्षा करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकणकर यांना पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. खरात यांच्याविरुध्द याआधी एक प्रकरण दाबण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. खरात यास अटक करण्यात आल्याने त्याने याआधी अत्याचार केलेल्या इतरही महिला पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.