शफी पठाण, लोकसत्ता

कुसुमाग्रज नगरी, नाशिक : देशात अनेक गंभीर मुद्यांवरून रणकंदन माजले आहे. या मुद्यांवरून सर्वसामान्यांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी माध्यमांच्या मनोरंजनीकरणाचा प्रयत्न होत आहे, असा सूर ‘वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण’ या परिसंवादात रविवारी उमटला.

नाशिक येथील साहित्य संमेलनात रविवारी हा परिसंवाद झाला. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात ज्येष्ठ लेखक व विचारवंत हरी नरके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्रे डॉ. विश्वंभर चौधरी, माध्यमतज्ज्ञ जयदेव डोळे, ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर आणि सूत्रसंचालकाच्या रूपात ‘साम’ वृत्तवाहिनीचे संपादक प्रसन्न जोशी सहभागी झाले होते.

यावेळी अपर्णा वेलणकर म्हणाल्या, वृत्तमाध्यमांतील मनोरंजनीकरणाला माध्यमांचे व्यावसायिकरण कारणीभूत आहे. हरी नरके म्हणाले, दिवाळी अंकाचा प्रारंभच मनोरंजन नावाच्या दिवाळी अंकाने १९०९ साली झाला. कालौघात मनोरंजनाची व्याख्याच बदलली. स्वातंत्र्य चळवळीतील टिळक, आगरकर, गांधी, डॉ. आंबेडकर हे सर्व नेते संपादक होते. त्यांनी समाजाला जागृत करताना मनोरंजनाला निषिद्ध मानले नाही. पण, आता ‘टीआरपी’साठी मनोरंजनांच्या नावावर निर्बुद्ध प्रयोग केले जात आहेत, अशी खंत हरी नरके यांनी व्यक्त केली.

प्रा. जयदेव डोळे यांनी अतिशय रंजक पद्धतीने या गंभीर विषयावर भाष्य केले. ‘‘जी राजकीय सत्ता योग्यपणे देश चालवू शकत नाही, ती अशा मनोरंजनीकरणाचा आधार घेत असते. आधीच्या काळातील हिटलर, मुसोलिनी आणि अलिकडील ट्रम्प ही त्याचीच उदाहरणे आहेत. आताचे राज्यकत्रे अशा मनोरंजनीकरणात गुंतले आहेत, याकडेही प्रा. डोळे यांनी लक्ष वेधले. डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले, वृत्तमाध्यमांचे भांडवल खासगी क्षेत्राकडून येत असेल तर माध्यमांचे मनोरंजनीकरण टाळणे कठीण आहे. सूत्रसंचालक प्रसन्न जोशी यांनी मात्र माध्यमांमध्ये मनोरंजन आवश्यक असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, समाजमाध्यमातील ‘मीम’ हे नवमाध्यम अभिव्यक्तीचे सशक्त प्रतीक आहे. ‘स्टॅन्ड अप कॉमे डी’तील एक विडंबनात्मक कविताही अग्रलेखाच्याच तोडीची असू शकते. त्यामुळे समाज बदलतोय हे मान्य करूनच वृत्तमाध्यमांकडे बघायला हवे, असे आग्रही प्रतिपादन प्रसन्न जोशी यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर अध्यक्षीय भाषणात म्हणाले, वृत्तमाध्यमांवरील मनोरंजनीकरणाच्या टीकेला समाजावरीलच टीकेच्या रूपात पाहिले गेले पाहिजे. कारण समाजाचेच प्रतििबब माध्यमात उमटत असते. समाजात प्रगल्भ वैचारिकतेचा अभाव असेल तर तो माध्यमांमध्येही दिसेलच. आज वाचकांना चांगले वाचायला आवडत नसेल तर चांगले वाचायला देण्याची क्षमता माध्यम गमावून बसली आहेत, असे म्हणायला वाव आहे. लोकांना जे वाटते ते स देण्याचे काम तर माध्यमांनी करावेच, पण जे लोकांना माहिती नाही ते लोकांपर्यंत कसे पोहोचेल याचा विचार माध्यमांनी करायला हवा.

काही माध्यमकर्मीचा उतावळेपणाही या मनोरंजनीकरणाच्या टीकेला कारणीभूत ठरत आहे, हे दुर्लक्षिता येणार नाही, याकडेही कुबेर यांनी लक्ष वेधले. माध्यमे  आपल्या कर्तव्याप्रती किती जागरूक असू शकतात, याचे उत्तम उदाहरण नुकतेच अमेरिकेत पाहायला मिळाले. अमेरिकेच्या सत्ताबदलात माध्यमांची भूमिका मोठी होती. त्या मार्गाने भारतीय माध्यमांना न्यायचे असेल तर समाजालाही प्रगल्भ व्हावे लागेल, असेही कुबेर यांनी स्पष्ट केले.

गिरीश कुबेर यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न

परिसंवादात सहभागी होण्यासाठी आलेले ‘दै. लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या अंगावर संमेलनस्थळी बुक्का फेकण्याचा प्रयत्न दोन संशयितांनी केला. कुबेर यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. सतीश काळे (४६) व राजेंद्र गुंड (४२, दोघेही पुणे) अशी त्यांची नावे असून ते संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित पुण्याहून दुचाकीवर आले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास कुबेर यांनी ग्रंथ प्रदर्शनाची खुल्या वाहनातून पाहणी केली.

अतिविशेष व्यक्तींच्या कक्षाकडे त्यांचे वाहन प्रवेश करत असताना गर्दीतून पुढे आलेल्या संशयितांनी बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी निषेध केला. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण’ या परिसंवादात ज्येष्ठ लेखक  हरी नरके, डॉ. विश्वंभर चौधरी, जयदेव डोळे, अपर्णा वेलणकर आणि प्रसन्न जोशी सहभागी झाले होते.