जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजल्यानंतर भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.शरद पवार गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याचाही मंगळवारी अजित पवार गटात मुंबईत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील तसेच माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे आणि अरुण पाटील यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी हे देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी होती.

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही जाणाऱ्यांना जाऊ द्या, असे म्हणत त्यावेळच्या चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला होता. मात्र, त्यावेळी खुद्द गुजराथी यांनी स्पष्ट केले होते की, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मला आजवर भरपूर दिले आहे. त्यामुळे त्यांना सोडून जाण्याचा किंवा दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. आता मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते कोणत्याही पक्षात असले तरी, मी फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार आहे.

त्याच गुजराथी यांनी आता शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. जळगावच्या राजकारणात आतापर्यंत होऊन गेलेल्या काही मुरब्बी राजकारण्यांत गुजराथी यांचीही गणना होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीपासून शरद पवार यांना दिलेली साथ आजतागायत कायम राहिली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही ते पवार यांच्या बरोबर खंबीरपणे उभे होते. पक्षाच्या जळगावमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गरज पडली तेव्हा त्यांनी वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शनही केले. असे असताना, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी जळगावात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीला ते मुद्दाम अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एरवी नेहमी व्यासपीठावरील पहिल्या रांगेत बसणारे गुजराथी असे अचानक पक्षाच्या बैठकीपासून लांब राहिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस मागे धुळे दौऱ्यावर आले असता गुजराथी तिथे आवर्जून उपस्थित राहिले. इतकेच नाही तर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन करून दोन शब्द हितगूज केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले होते. गुजराथी आता भाजपमध्ये जातात की काय, अशी नवी चर्चा सुरू झाली होती. याशिवाय, चोपड्यात एका कार्यक्रमानिमित्त आलेले अजित पवार गटाचे नेते मंत्री बाबासाहेब पाटील यांनी थेट गुजराथी यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. वैयक्तिक गुजराथी यांनी मात्र दोघांची भेट राजकीय नसल्याचा दावा केला होता. मात्र, आता मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी जळगाव दौऱ्यावर आल्यावर गुजराथी यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाचा थेट दावाच केला आहे.