१० उमेदवार पुरस्कृत करण्याची वेळ

अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी झालेली हाणामारी आणि एबी फॉर्म वितरणातील सावळा गोंधळचा जबर फटका बसलेल्या शिवसेनेला प्रचाराऐवजी हा घोळ निस्तरण्यासाठी ‘द्राविडी प्राणायाम’ करावा लागत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना काही जणांनी रंगीत छायांकित प्रतीचे एबी फॉर्म सादर करून चूक झाल्याचे मान्य करत शिवसेनेवर विविध प्रभागांत अधिकृतऐवजी १० उमेदवार पुरस्कृत करण्याची वेळ आल्याचे पक्षाचे सचिव खा. अनिल देसाई यांनी  सांगितले. या पुरस्कृत उमेदवारांना एकच चिन्ह मिळावे, असा सेनेचा प्रयत्न आहे. परंतु, वेगवेगळ्या प्रभागांतील उमेदवारांना एकच चिन्ह देता येईल की नाही, या संदर्भात नियमावलीच्या आधारे संबंधित प्रभागांचे निवडणूक अधिकारी निर्णय घेतील, असे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. आधी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सादर झालेले संबंधितांचे अर्ज छाननीत एबी फॉर्म कोरे असणे, एका जागेसाठी दोघांनी एबी फॉर्म भरणे यामुळे अपक्ष ठरले. अपक्ष म्हणून रिंगणात उतरणाऱ्यांना चिन्हाबाबत आपला पसंतीक्रम नोंदविता येतो. सेनेच्या पुरस्कृत उमेदवारांना ती संधीदेखील नसल्याने संबंधितांना एकच चिन्ह मिळण्याची शक्यता धुसर असल्याचे या प्रक्रियेतील जाणकारांचे मत आहे.

अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पांडे समर्थक आणि महानगरप्रमुख बोरस्ते गटात झालेल्या वादाचा फटका शिवसेनेला बसला असून छाननी प्रक्रियेअंती दहा उमेदवारांचे अर्ज पक्षाचे उमेदवार न ठरता अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आले. त्यात प्रभाग क्रमांक चारमधील चारही उमेदवारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ३० मध्ये शिवसेनेला धक्का बसला. या ठिकाणी अर्जाची झेरॉक्स प्रत सादर झाल्यामुळे संजय चव्हाण, नीलेश चव्हाण, रशिदा शेख आणि शकुंतला खोडे यांचे अर्ज बाद ठरविले गेले. तसेच प्रभाग क्रमांक २९ मध्ये अरविंद शेळके व सतीश खैरनार यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. या प्रकरणात शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या पाश्र्वभूमीवर, सोमवारी पक्षाचे सचिव खा. देसाई यांनी नाशिक गाठले. गोंधळाची चौकशी करतानाच ज्या प्रभागांमध्ये या चुका झाल्या, तिथे काय सुधारणा करता येईल, यावर विचारमंथन करत पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. त्या बाबतची माहिती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. सेनेच्या काही उमेदवारांकडून एबी फॉर्ममध्ये अनावधानाने चुका झाल्याचे त्यांनी मान्य केले. चुका टाळण्यासाठी काहींनी छायांकित प्रतीवर सराव केला. ऑनलाइन अर्ज दाखल करताना काही जणांकडून छायांकित अर्ज भरले गेल्याची चूक झाली. यामुळे शिवसेनेला दहा उमेदवार पुरस्कृत करावे लागणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. या सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळावे, अशी मागणी सेनेने केली.

प्रभाग क्रमांक २९ मध्ये दीपक बडगुजर अणि भूषण देवरे हे उमेदवारी मागे घेणार आहेत. त्यांच्याऐवजी अरविंद शेळके व सतीश खैरनार यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ग्राह्य धरावे, असे साकडे सेनेच्या शिष्टमंडळाने घातले. या सर्व बाबींवर निवडणूक अधिकारी नियमावलीचा अभ्यास करून निर्णय घेतील, असे आयुक्तांनी सांगितले. शिवसेनेला ज्या दहा उमेदवारांना पुरस्कृत करावे लागणार आहे, त्यांना एकच पक्षचिन्ह मिळण्याची शक्यता धुसर आहे. अपक्ष म्हणून उमेदवारी करणाऱ्याला अर्जात तीन चिन्ह पसंतीनुसार देता येतात. चिन्ह वाटप करताना त्यांना प्राधान्य दिले जाते. सेनेच्या उमेदवारांना तीदेखील मुभा राहिलेली नाही. या विचित्र त्रांगडय़ातून काही मार्ग काढण्याचा सेनेचा प्रयत्न असला तरी पुरस्कृत उमेदवारांना एकच चिन्ह मिळेल, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

पदाधिकाऱ्यांविरुद्ध आगपाखड

एबी फॉर्मच्या घोळावरून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपले पक्षांतर्गत हिशेब चुकते करण्यास सुरुवात केली आहे. एबी फॉर्मच्या वितरणाला महानगर व जिल्हाप्रमुख जबाबदार असल्याच्या तक्रारी देसाई यांच्यासमोर मांडण्यात आल्या. उमेदवार निश्चित होऊनही एबी फॉर्मचे वितरण आधीच केले गेले नाही. उत्कंठा वाढविण्यासाठी अखेरच्या दिवसापर्यंत ते वितरित केले गेले नाही. विलंबाने वितरित झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याची बाब काही पदाधिकाऱ्यांनी देसाई यांच्यासमोर मांडली. या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करत निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत मतभेद चव्हाटय़ावर येऊ नयेत म्हणून सबुरीची भूमिका घेण्याचा सल्ला त्यांनी दिल्याचे सांगितले जाते. देसाई यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून महापालिकेत आयुक्तांची भेट घेतली. या वेळी महानगरप्रमुख अजय बोरस्ते अनुपस्थित होते.

भाजपचे नाते देवाणघेवाणीशीच

भाजपमधील तिकीट वाटपावरून व्हायरल झालेल्या ध्वनिचित्रफिती आणि आरोप-प्रत्यारोपांच्या अनुषंगाने भाजपचे नाते व सख्य देवाणघेवाणीशीच असल्याचा टोला देसाई यांनी लगावला. नवे महाभारत घडविणाऱ्यांचे राजकारण त्यांना लखलाभ होवो. नाशिककर सुज्ञ असून ते सेनेलाच मतदान करतील, असा दावाही त्यांनी केला.