समृद्धी महामार्गाच्या कामामुळे टाकेद-धामणगाव रस्त्याची चाळण

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद-धामणगाव रस्त्याची समृध्दी  महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्रचंड प्रमाणात वाताहात झाली आहे.

वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास;  कडवा नदीच्या दोन्ही पुलांवर मोठमोठे खड्डे

नाशिक : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद-धामणगाव रस्त्याची समृध्दी  महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्रचंड प्रमाणात वाताहात झाली आहे. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे झाले असून या रस्त्याने  वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

या रस्त्याने विद्यार्थी, शिक्षक, कामगार, प्रवासी,रुग्ण, पर्यटक मोठय़ा संख्येने जा-ये करतात. धामणगाव -टाकेद रस्त्यावर धामणगावजवळ समृद्धी महामार्गाचे कामकाज मोठय़ा प्रमाणावर सुरू असून याठिकाणी खडकाळ भाग फोडण्यासाठी स्फोट केले जात असून या स्फोटामुळे बाहेर पडणारे दगड अवजड वाहनांतून इतरत्र नेले जात आहेत.

समृद्धी महामार्गातील कामात निघणारे मोठमोठे दगड भरलेली अवजड वाहने धामणगाव-टाकेद या रस्त्याने मोठय़ा प्रमाणावर जात आहेत. या कारणास्तव रस्त्यावर मोठमोठे  जीवघेणे खड्डे पडले असून या खड्डेमय रस्त्याने हजारो वाहनधारकांना रोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पाऊस सुरु असतांना किमान खड्डय़ात पाणी साचलेले राहत असल्याने कुठे खड्डा आहे, त्याचा अंदाज वाहनधारकांना येत असे. आता पावसाळा संपल्याने खड्डय़ांचा अंदाजच येत नाही. त्यामुळे वाहन अचानक खड्डय़ात जाऊन प्रवाशांची हाडे खिळखिळी होऊ लागली आहेत. वाहनांचे होणारे नुकसान वेगळेच. खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे अपघात नेहमीचे झाले आहेत.

टाकेदजवळ कडवा नदीच्या दोनही पुलांवर मोठमोठे जोवघेणे खड्डे पडले असून टाकेद- अधरवड-टाकेद खुर्द रस्त्यावर पुलाजवळ एक खड्डा तर अतिशय मोठा आहे. या खड्डय़ात अनेक वाहने अडकत आहेत. याच रस्त्याने संकटकाळात गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक,अपघातात जखमी झालेले रुग्ण यांना उपचारासाठी रुग्णालयात न्यावे लागते. टाकेद फाटा-अधरवड ते टाकेद- म्हैसवळण घाट रस्ता,पिपळगाव मोर ते वासाळी फाटा, घोटी-कोल्हार रस्ता आणि टाकेद ते धामणगाव रस्ता या तीनही अत्यंत महत्वाच्या असलेल्या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून मोठी दयनीय अवस्था झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि  प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि खड्डे बुजवावेत, अशी मागणी मनसे उपजिल्हा प्रमुख संदिप किर्वे यांनी केली आहे.

समृध्दी महामार्गाच्या अवजड वाहनांमुळे टाकेद-धामणगाव रस्त्याची अशी वाट लागली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sewing road work samruddhi highway ysh

Next Story
राज ठाकरेही साधू-महंतांच्या दर्शनार्थ नाशिकमध्ये
ताज्या बातम्या