पीडितेची देहविक्रयासाठी तस्करी, तिघांना अटक
बांगलादेशी मुलीची तस्करी प्रकरणात सिन्नरच्या मुसळगावमधील नानी ऊर्फ मंगल गंगावणेसह पीडितेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात नानीचा मुलगा विशाल गंगावणे, दलाल सोनू देशमुख यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीला देहविक्रय व्यवसायात अडकवणारी तिची मावशी आणि दलाल फरार आहे. या घटनाक्रमात पोलिसांची कार्यशैली संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही महिन्यांपूर्वी पीडित मुलीला शोधून बांगलादेशमध्ये पोहोचविल्याचा दावा केला गेला होता. परंतु, या मुलीने येथे येऊन पोलिसांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे उघड केले.
काही महिन्यांपूर्वी बांगलादेश येथील युवतीस तिची मावशी माजिदा अब्दुलने भारत फिरविण्याचे आमिष दाखवत सिन्नरच्या मुसळगाव परिसरात वेश्या व्यवसायाकरिता नानी नामक महिलेकडे विकले होते. त्यानंतर पीडित युवतीची नानीने मुंबई येथे विक्री केली. काही दिवस मुंबईत ठेवल्यानंतर तिला कोलकाताच्या बाजारात देहविक्रीसाठी विकले गेले. कोलकाता येथून जीव मुठीत धरून मुलीने पलायन करून नाशिक गाठले आणि प्रसारमाध्यमांसमोर आपबिती कथन केल्यानंतर खळबळ उडाली. या घटनाक्रमातील नरकयातना कथन करत पीडितेने बांगलादेशमधून चाललेल्या मुलींच्या तस्करीवर प्रकाश टाकला. सिन्नर पोलिसांनी दहा महिन्यांपूर्वी बांगलादेशी मुलींची खरेदी करणाऱ्या नानीवर कठोर कारवाई केली असती तर या मुलीची मुंबईहून कोलकाता येथे झालेली विक्री टळली असती. परंतु, सिन्नर पोलिसांनी मुसळगावच्या कुंटणखान्याकडे दुर्लक्ष केले.
पीडितेने प्रसारमाध्यमांसमोर ओढावलेली स्थिती मांडल्यानंतर ग्रामीण पोलीस सक्रिय झाले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी पीडितेसमवेत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. त्यावरून विशाल गंगावणे, सोनु देशमुख, नानी ऊर्फ मंगल गंगावणे (सर्व रा. सिन्नर) आणि पीडित मुलीची मावशी मजिदा अब्दुल (बांगलादेश) यांच्याविरुद्ध पिटा कायद्यान्वये सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री उशिरा सिन्नर येथून विशाल आणि सोनूला अटक केली. तसेच संशयित नानीला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील कुंटणखान्यावर कारवाईचा प्रस्ताव तयार केला गेला असून तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.