नंदुरबार -जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहादा नगरपालिकेला विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केला आहे. निधी द्या, अन्यथा शहादा नगरपालिका गुजरात किंवा मध्य प्रदेशात हस्तांतरित करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या मागणीसाठी नगराध्यक्ष पाटील यांनी गुरुवारी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले.

नंदुरबार जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांपैकी चार नगरपरिषदांना कोट्यवधींचा निधी मिळाला असताना शहादा नगरपालिकेला मात्र एक रुपयाही मिळाला नसल्याचा दावा नगराध्यक्ष पाटील यांनी केला. निवडणूक होऊन दहा महिने उलटले, तरी विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने त्यांनी प्रशासन आणि पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

शहादा नगरपालिकेने निधीसंदर्भात एकमताने ठराव मंजूर करूनही निधी का दिला जात नाही ? नंदुरबार जिल्हा नियोजन समितीकडून लोकसंख्येच्या निकषानुसार निधी वितरित केला जात असेल, तर शहादा नगरपालिकेला निधीपासून वंचित का ठेवले जात आहे, असे सवाल पाटील यांनी उपस्थित केले.

शहादा नगरपरिषद ही जिल्ह्यातील टीएसपी क्षेत्राबाहेरील एकमेव नगरपालिका असल्याचे सांगत, निधीवाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नगराध्यक्ष पाटील यांनी केला. जनता विकास आघाडीकडून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या अभिजीत पाटील यांना राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षांकडून सहयोगी सदस्यत्व स्वीकारण्याची अपेक्षा असल्याने निधी रोखून दबाव आणला जात आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मात्र, या आरोपांना प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

विकास कामांसाठी निधी मिळवताना सत्ताधारी पक्षात असणे हा निकष असेल, तर हा कोणता निकष आहे, असा सवाल नगराध्यक्ष पाटील यांनी केला. निधी मिळवण्यासाठी टक्केवारीची अट असेल, तर आम्ही टक्केवारी देतो; मात्र शहादा नगरपालिकेला विकास कामांसाठी निधी द्या, अशी आर्त हाक त्यांनी उपोषणादरम्यान दिली. लाक्षणिक उपोषणानंतरही निधी मिळाला नाही, तर नगरपालिकेला टाळे ठोकून अधिक आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा नगराध्यक्ष पाटील यांनी दिला. दसऱ्यानंतर आंदोलनाचे खरे रौद्ररूप पाहायला मिळेल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे शहादा नगरपालिकेच्या निधीचा प्रश्न आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.