जळगाव : जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावात अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबात वाढलेल्या शाईस्ता दादाराव तडवी हिची जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर पोलीस दलात निवड झाली आहे. वीटभट्टीवर मजूरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या आई-वडिलांच्या या मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत साध्य केलेले यश संपूर्ण हिवरखेडा गावासाठी प्रेरणादायी ठरले आहे. तिच्या या यशाचा आनंद संपूर्ण गावाने सवाद्य मिरवणूक काढून साजरा केला.
शाईस्ताचे बालपण हिवरखेडा येथे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. आई-वडील दिवसभर उन्हातान्हात कष्ट करून वीटभट्टीवर काम करतात. रोजंदारी कामामुळे आर्थिक उत्पन्न अनिश्चित होते, त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती नेहमीच डळमळीत राहायची. काही वेळा घरात अन्नाचीही कमतरता जाणवत असे. अशा कठीण परिस्थितीत अनेक वेळा शिक्षण थांबवण्याची वेळ येऊ शकली असती, मात्र शाईस्ताने परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. तिने लहानपणापासूनच पोलीस बनण्याचे स्वप्न मनाशी बाळगले आणि त्या दिशेने सातत्याने वाटचाल सुरू ठेवली. शिक्षणाच्या बाबतीतही ती तितकीच जिद्दी होती. गावात चौथीपर्यंत शाळा होती. त्यामुळे पहूर (ता. जामनेर) येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात तिने माध्यमिक शिक्षण घेतले.
२०२१ मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शाईस्ताने विज्ञान शाखेत बारावीचे शिक्षण पूर्ण करत अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला. आर्थिक अडचणी असूनही शिक्षणात खंड पडू दिला नाही. अभ्यासासाठी आवश्यक असलेली साधने, पुस्तके आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी तिला अनेकदा संघर्ष करावा लागला, पण तिने हार मानली नाही. पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःची शारीरिक तयारी अत्यंत कठोर पद्धतीने सुरू ठेवली.
पहाटेच्या शांत वातावरणात ती रोज उठून रानातील खडतर आणि उंचसखल वाटांवर धावण्याचा सराव करत असे. शास्त्रोक्त प्रशिक्षण किंवा आधुनिक सुविधा नसतानाही तिने स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून सराव सुरू ठेवला. तिच्या सरावात कधीही खंड पडला नाही. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तिची शारीरिक क्षमता आणि मानसिक ताकद दोन्हीही अधिक मजबूत झाली.
पहिल्याच प्रयत्नात पोलिसात भरती
अभ्यास आणि शारीरिक तयारी यांचा समतोल साधत शाईस्ताने यंदा पहिल्यांदा पोलीस भरतीसाठी आवश्यक सर्व टप्प्यांची तयारी केली. ज्यामुळे तिला कठोर परिश्रमांचे फळ पहिल्याच प्रयत्नात मिळाले. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलामध्ये तिची निवड झाली. विशेष म्हणजे, हिवरखेडा गावातून पोलीस दलात भरती होणारी ती पहिली मुलगी ठरली. ज्यामुळे गावाच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला गेला. शाईस्ताची पोलीस दलात निवड झाल्याची बातमी समजताच कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हिवरखेडा ग्रामस्थांनी देखील शाईस्ताची सवाद्य मिरवणूक काढून तिच्या यशाचा उत्सव साजरा केला.
