नाशिक – शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी अमोल रमेश कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. न्यायमूर्ती माधव जे. जामदार यांनी हा आदेश दिला.

राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक विभागातील विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. सन २०२२ ते २०२४ या कालावधीत झालेल्या नियुक्त्या त्यापूर्वीच्या काळात झाल्याचे दर्शवून, बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतनाची थकबाकी शासनाकडून मिळविण्यात आल्याचे अभियोजन पक्षाचे म्हणणे आहे. या प्रकरणात एकूण ९६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा संदर्भ न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे.

अमोल कुलकर्णी याच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील एम. एफ. तराळ विद्यालयाशी संबंधित प्रकरण विचाराधीन होते. या विद्यालयातील १७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या २०२४ मध्ये झाल्या असताना, त्या २०१४ ते २०१७ या कालावधीत झाल्याचे दर्शविण्यात आल्याचा आरोप आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक वेतनाची थकबाकी मागण्यात आल्याचेही अभियोजन पक्षाचे म्हणणे आहे.

तपासादरम्यान विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक रामदास एस. पाटील यांनी दिलेल्या जबाबानुसार, आरोपी अमोल कुलकर्णी याने नियुक्तीच्या प्रस्तावांशी संबंधित कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संबंधित कालावधीत आपण मुख्याध्यापकपदी कार्यरत नसल्याचे नमूद करून त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. तसेच, आरोपी संबंधित शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने काम करून नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करत असल्याची बाब तपासात समोर आल्याचे न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे.

आरोपीच्या वतीने तो शिपाई पदावर कार्यरत असून, वरिष्ठांच्या निर्देशानुसार काम करत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तथापि, उपलब्ध कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासादरम्यान समोर आलेली आरोपीची कथित भूमिका विचारात घेऊन अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास पुरेसा आधार नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यानुसार अमोल कुलकर्णी याचा अर्ज फेटाळण्यात आला. यापूर्वी रामदास तराळ याचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.