नाशिक – नाशिकचा १५० कोटींच्या ‘शालार्थ आयडी ‘ घोटाळा प्रकरणात भोंदू अशोक खरातचा भाऊ दिलीप खरातचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु, यासंदर्भात विशेष तपास पथकाकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दिलीप खरात यांनी याप्रकरणाशी आपला कोणताही संंबंध नसल्याचा दावा केला आहे.

नाशिक विभागात बनावट शालार्थ आयडीचा ८४१ शिक्षकांनी लाभ घेतल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे, ज्याने तक्रार केली ते तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण हेच या गुन्ह्यात सहभागी होते. तेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निघाले. नाशिकरोड पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल आहे. यामध्ये तत्कालीन उपसंचालक नितीन उपासनी, बी. बी. चव्हाण आणि नितीन बच्छाव यांच्यासह नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार जिल्ह्यातील ८४१ शिक्षकांविरुध्द गुन्हा दाखल आहे. या शिक्षकांमध्ये अशोक खरातचा भाऊ दिलीप खराचाही सहभाग आहे.

तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्फत ही नियुक्ती झाल्याचा आरोप होत आहे. शालार्थ घोटाळा विशेष तपास पथक अधिकारी रामदास शेळके यांनी, घोटाळ्यात अशोक खरातचा भाऊ आहे की नाही याची माहिती घेण्यात येत असून सध्या त्याविषयी सांगता येणार नाही, असे स्पष्ट केले. दुसरीकडे, दिलीप खरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणात आपली कोणतीही चुक नसून आपल्याकडे सर्व कागदपत्रे असल्याचे नमूद केले.

शालार्थ घोटाळा प्रकरण?

नाशिक विभागात शिक्षण विभागाला हादरवून सोडणारा १५० कोटींचा महाघोटाळा उघड झाला आहे. बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून तब्बल ८४१ बोगस शिक्षकांची भरती करण्यात आली. या शिक्षकांच्या नावावर शासनाची तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षण क्षेत्रात या मुळे खळबळ उडाली आहे.

शालार्थ घोटाळ्यात तत्कालीन उपसंचालक नितीन उपासनी, बी. बी. चव्हाण, नितीन बच्छाव यांच्यासह नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचे चालक, अनेक शाळांचे मुख्याध्यापक आणि लेखाधिकारी यांचा सहभाग आहे. संगनमताने शालार्थ आयडी देत कागदपत्रांची पडताळणी न करता आयडी देत शिक्षकांचे पगार काढण्यात आले. या मध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी जनरेट करणे आणि विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानित पदांवर दाखवणे आदी पध्दतीचा अवलंब झाला.