धुळे : बनावट शालार्थ आदेशाच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक करण्यात आली. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शशिकांत भाऊराव हिंगोणीकर (वय ६६, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी, रा. निर्मला रेसिडेन्सी, फ्लॅट क्र. ९, भिकनचंद जैन नगर, पिंपराळा रोड, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक उपसंचालक कार्यालय, नाशिक विभागाच्या कार्यक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक विभागातील चारही जिल्ह्यांतील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैयक्तिक मान्यता प्रस्ताव किंवा शालार्थ प्रस्ताव नसताना मागील तारखेच्या नियुक्त्या दाखविण्यात आल्या. बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंदी करून संबंधितांना वेतन व थकबाकीची रक्कम मिळवून देण्यात आली. या धक्कादायक प्रकारातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक व अन्य संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत सुमारे १,२०० संशयित निष्पन्न झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. २४) शशिकांत हिंगोणीकर याला अटक करण्यात आली. तो सन २०११ ते २०१५ या कालावधीत जळगाव जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असताना जळगाव जिल्ह्यातील एकूण २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे कोणतेही प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात प्राप्त नसतानाही त्याने बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शशिकांत हिंगोणीकर याचा शोध घेतला. तो धुळे येथे असल्याची माहिती तपास अधिकारी तथा गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे, उपनिरीक्षक नंदकुमार नांदुळीकर, चंद्रकांत गवळी, तेजस मते आणि सुनील खैरनार यांनी धुळे येथे शोधमोहीम राबवून हिंगोणीकर याला ताब्यात घेतले.

आरोपी शशिकांत भाऊराव हिंगोणीकर याला पुढील कारवाईसाठी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, किरण शेवाळे, राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी आणि संदीप बागल हे करीत आहेत.