नाशिक – बनावट शालार्थ आदेशाच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी दलाल तुषारकुमार साळुंके याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील विविध शालेय संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची वैयक्तिक मान्यता, कायम मान्यता, संचमान्यता आणि शालार्थ आयडीचे बनावट आदेश संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांसोबत संगनमत करून पैशांची देवाणघेवाण करत संबंधितांना पुरवल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने एका शाळेत लॅब असिस्टंट असलेल्या संशयित तुषारकुमार उखाजीराव साळुंके (३८, रा. शेवाळी, ता. साक्री) याला अटक केली आहे.

उत्तर महाराष्ट्रासह राज्यात चर्चेत ठरलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास शहर गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जात आहे. शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची व्याप्ती पाहता आर्थिक गुन्हे शाखेकडून हा तपास एसआयटीकडे देण्यात आला. या प्रकरणात तत्कालीन तीन उपसंचालकांसह १२०० जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील ८४१ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोणतेही वैयक्तिक मान्यता व शालार्थ प्रस्ताव नसताना मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेशाच्या आधारे शालार्थ प्रणालीत शालार्थ ड्राफ्ट भरून घेण्यात आला. त्याद्वारे वेतन आणि थकबाकीची रक्कम प्राप्त करून शासनाची १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत १२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत.

यामध्ये धुळे जिल्ह्यातील एका शाळेतील लॅब असिस्टंट आरोपी तुषारकुमार साळुंके (३८, रा. साक्री) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी प्रशांत वाडीले आणि साळुंके या दोघांनी धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील विविध शालेय संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता, कायम मान्यता, संचमान्यता आणि शालार्थ आयडीचे बनावट आदेश संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राप्त करून ते संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांना पुरवल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात साळुंके याला अटक करून नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता त्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.