नाशिक – नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक तसेच अहिराणी भाषा साहित्य स्वरुपात सर्वत्र पोहचविण्यात महत्वपूर्ण वाटा उचलणारे सटाणा येथील साहित्यायन संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा.शंकर.कडू कापडणीस यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने रविवारी रात्री ११:३० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल नाशिकसह राज्यभरातील लेखक, साहित्यिकांनी दु:ख व्यक्त केले आहे. साहित्यायन संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच संस्थापक सचिव, मराठी साहित्याचे आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक, उत्तम वक्ता अशी वेगवेगळी वैशिष्ट्ये प्रा. शं. क. कापडणीस यांच्याबद्दल सांगता येतील. सटाणा महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.

त्यांच्याबरोबर कार्यरत अनेक शिक्षकांना त्यांची काम करण्याची पध्दत विलक्षण भावली. अहिराणी भाषिक असलेले प्रा. शं. क. कापडणीस यांचे आपल्या अहिराणी भाषेवर विलक्षण प्रेम. अहिराणी भाषेची समृध्दता सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सांज किरणे’ हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक असून ते अक्षरबंध प्रकाशन, नाशिक द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘बहिशाल शिक्षण मंडळांतर्गत’ विविध महाविद्यालयांमध्ये व्याख्याते म्हणूनही सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करीत असत. अहिराणी भाषेतील लोकसाहित्य त्यातील जात्यावरची गाणी, वऱ्हाडी गीते, विविध सण- वारांची गीते, विशेषत्वाने अक्षय तृतीयेची गाणी, या गाण्यांचा इतिहास, त्यांची निर्मिती कशी झाली, याविषयी त्यांनी साहित्यातून मांडणी केली.

शिवाय, ते उत्तम वक्तेही असल्याने ठिकठिकाणी व्याख्यानांमधून याबद्दल माहिती देत असत. मराठी आणि अहिराणी भाषेवर प्रेम करणारे प्रा. शं. क. कापडणीस हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. संत साहित्याचे थोर व्यासंगी अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत आणि निष्ठावान संशोधक प्रा. शं क.कापडणीस यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्राची कधीही न भरून येणारी मोठी हानी झाली असल्याची भावना साहित्यिकांमधून व्यक्त होत आहे. संत वाङ्मयाचा सखोल अभ्यास, निरूपण आणि सोप्या भाषेत समाजापर्यंत त्याचा प्रसार करण्यात प्रा. कापडणीस यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. संतांची शिकवण आणि त्यांचा तात्विक वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर निरपेक्ष वृत्तीने कार्य केले.
पुण्याचे प्रा. डाॅ. पी. एस. शहा यांनी, प्रा. शं. क. कापडणीस यांच्याविषयीची आपली भावना मांडली आहे.

बागलाणचे भूषण असलेले प्रा शं क कापडणीस यांचे निधन झाल्याचे वाचून खूप दुःख झाले त्यांच्या समवेत सटाणा महाविद्यालयात अन् साहित्यायन संस्थेत सुमारे २५ वर्ष काम करण्याचे भाग्य मला लाभले. ते साहित्यायनचे आधारवडच होते. त्यांच्या दांडग्या लोकसंग्रहाचा आणि अनेक साहित्यिकांच्या ओळखीचा फायदा सटाण्यात साहित्यसंमेलने भरविण्यासाठी झाला.

डॉ. माजगावकर दादा आणि प्रा कापडणीस सरांमुळेच साहित्य चळवळ बागलाणात रुजली अन् विस्तारली त्यांनी बागलाणच्या अनेक नवकवी आणि लेखकांना लेखनासाठी प्रोत्साहन दिले. मार्गदर्शन केले. त्यामुळेच आजचे साहित्ययानचे भव्य स्वरूप दिसत आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि मार्गदर्शनामुळेच बागलाणमध्ये अनेक साहित्यमंडळेही निर्माण झालीत त्यांच्या सारख्या बहुआयामी साहित्यिकाचा आज अस्त झाला आहे त्यांच्या निधनामुळे बागलाणच्या साहित्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली असल्याचे प्रा. डाॅ. शहा यांनी नमूद केले आहे.