उत्तर महाराष्ट्रात महायुतीच्या वर्चस्वाला धक्का

अविनाश पाटील, नाशिक

विजयासाठी सूक्ष्म नियोजनावर भर देणारे आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उमेदवार निवडीपासून प्रचारात जाणीवपूर्वक लक्ष देऊनही जळगावमध्ये तीन जागांवर फटका, सत्ताधाऱ्यांविरोधात शरद पवार यांनी एकहाती निर्माण केलेल्या प्रचाराच्या झंझावातामुळे राष्ट्रवादीच्या स्थितीत झालेली सुधारणा, शिवसेनेच्या प्रस्थापितांविरुद्धचा असंतोष आणि मनसे, वंचित बहुजन विकास आघाडी भोपळा फोडू शकत नसताना एमआयएमने मिळविलेल्या दोन जागा, ही उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची वैशिष्टय़े सांगता येतील.

निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीकडून उपस्थित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मुद्दय़ांमुळे फारसे प्रभावित न झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस आघाडीकडून मांडल्या गेलेल्या कृषी, उद्योग, बेरोजगारीविषयक समस्यांना चांगलेच उचलून धरल्याचे प्रतिबिंब निकालात उमटले आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकूण ३५ जागांपैकी भाजपने १९, शिवसेना १५, राष्ट्रवादी २१, काँग्रेसने १३ जागा लढविल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एका जागेचा, तर काँग्रेसला दोन जागांचा फटका बसला. राष्ट्रवादीच्या जागा मात्र दोनने वाढल्या. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील सर्व सहाही जागांवर महायुतीला दणदणीत यश मिळाले होते. या निवडणुकीतील मताधिक्यावर विसंबून विधानसभा निवडणुकीतही बाजी मारता येईल, असा अतिआत्मविश्वास महायुतीला वाटत होता. प्रचारादरम्यान ‘आमचे पहिलवान तेल लावून तयार आहेत, पण समोर तर कोणीच दिसत नाहीत’ अशी मल्लिनाथी करीत विरोधकांना क्षुल्लक समजले गेले. दुसरीकडे शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे नाशिक जिल्ह्य़ात कांदा आणि डाळिंब उत्पादक, तर जळगाव जिल्ह्य़ात केळी आणि कापूस उत्पादकांचे होणारे नुकसान प्रभावीपणे मांडले. परिणामी, उत्तर महाराष्ट्रात आघाडीच्या जागांमध्ये वाढ झाली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघात पाणी आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे सर्व विरोधक एक होऊनही त्यांना विजयश्री मिळविता आली.

महायुतीच्या प्रचारात कुठेच सुसूत्रता दिसून आली नाही. भाजप आणि सेना दोघांनीही एकमेकांच्या विरोधात उभ्या असलेल्या बंडखोरांना रसद पुरविण्याचेच काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावला सभा असताना याच मुद्दय़ावरून शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात सभास्थानी शाब्दिक चकमकही उडाली होती. शिवसेनेच्या बंडखोरीमुळे भाजपला मुक्ताईनगरमध्ये पराभव पत्करावा लागला. सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीनेही त्यांना पुरस्कृत केल्याने सामाजिक धुव्रीकरण होऊन भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. तर, अक्कलकुव्यात भाजपच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या तोंडातील विजयाचा घास हिरावला गेला. याशिवाय पक्षातंर्गत बंडखोरीने भाजपला साक्रीची जागा गमवावी लागली.

नाशिक जिल्ह्य़ात शिवसेनेच्या प्रस्थापितांना चांगलीच चपराक मिळाली. निफाडमध्ये अनिल कदम यांची हॅट्ट्रिक रोखली गेली. तर देवळालीत घोलप घराण्याची सुमारे ३० वर्षांपासून असलेली सत्ता संपुष्टात आली. राष्ट्रवादीच्या प्रचाराची साथ लाभल्याने जळगाव जिल्ह्य़ात यंदा काँग्रेसला रावेरमधून शिरीष चौधरी विजयी झाल्याने खाते उघडता आले. मालेगाव मध्य मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शेख आसिफ शेख रशिद यांच्या मवाळ धार्मिक भूमिकेपेक्षा एमआयएमच्या आक्रमकतेला मुस्लीम समाजाने जवळ केले. तर धुळ्यात अनिल गोटे, राजवर्धन कदमबांडे आणि शिवसेनेचे हिलाल माळी यांच्यातील मतविभागणी एमआयएमच्या पथ्यावर पडली. वंचित बहुजन आघाडी आणि मनसेची पाटी कोरीच राहिली.

रोहिणी खडसे, हरिभाऊ जावळे, अनिल गोटेंचा पराभव

मुक्ताईनगरमध्ये सलग सहा विजय मिळविलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याऐवजी पक्षाने त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना यंदा उमेदवारी दिली होती. त्यांना शिवसेनेचे बंडखोर आणि राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटील यांनी १९२७ मतांनी पराभूत केले. जळगाव जिल्ह्य़ातील भाजपचे दुसरे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार हरिभाऊ जावळे यांना रावेरमध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे मुफ्ती मोहंमद यांच्याकडून काँग्रेसचे आमदार रशिद शेख यांचा, तर धुळे शहरात एमआयएमचे डॉ. फारूख शहा यांनी महाआघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार अनिल गोटे, महायुतीचे हिलाल माळी आणि भाजपने रसद पुरविलेले अपक्ष उमेदवार तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचा पराभव केला.

निर्णायक मुद्दे

’ भाजप आणि शिवसेना यांच्या जागा कमी होण्यात युतीत एकजिनसीपणा नसणे, बंडखोरी ही कारणे

’ कांदा, डाळिंब, केळी उत्पादकांची सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी राष्ट्रवादीसाठी फायदेशीर

’ शरद पवार यांच्याविषयी शेतकऱ्यांना असलेली सहानुभूती

’ नाशिक जिल्ह्य़ात ग्रामीण भागात वर्चस्व असलेल्या शिवसेनेच्या जागा राष्ट्रवादीच्या यशामुळे कमी

’ एमआयएमला मालेगाव शहरात कडवटपणाचा, तर धुळे शहरात मतविभागणीचा लाभ

२०१४ मधील स्थिती

एकूण जागा- ३५

’ भाजप – १४

’ शिवसेना- ०७

’ राष्ट्रवादी- ०५

’ काँग्रेस- ०७

’ इतर- ०२

२०१९ मधील स्थिती

एकूण जागा- ३५

’ भाजप- १३

’ शिवसेना-०६

’ राष्ट्रवादी-०७

’ काँग्रेस- ०५

’ इतर- ०४