जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीला वेग दिला असून, जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार हे ३० ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळण्यासोबतच आगामी राजकीय रणनीतीला दिशा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात नुकत्याच झालेल्या जळगाव जिल्हा आणि शहर आढावा बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची ताकद वाढविण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.
शरद पवारांच्या दौऱ्याकडे लक्ष
जळगाव जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या प्रयत्नांना शरद पवार यांच्या ३० ऑगस्टच्या संभाव्य दौऱ्यामुळे अधिक बळ मिळणार आहे. जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवारांशी संवाद साधून पक्षाची आगामी वाटचाल आणि निवडणुकीची रणनीती याबाबत मार्गदर्शन होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना स्थानिक पातळीवरील संघटन मजबूत करणे, नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे आणि विविध मतदारसंघांमध्ये पक्षाचा जनाधार वाढविणे या मुद्द्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे शरद पवारांचा दौरा हा केवळ संघटनात्मक कार्यक्रम न राहता जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.
सात मतदारसंघांवर विशेष लक्ष
मुंबईतील बैठकीत जळगाव शहरासह जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर आणि चोपडा या सात विधानसभा मतदारसंघांचा विशेष आढावा घेण्यात आला. या मतदारसंघांमध्ये पक्षाची निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. मतदारसंघनिहाय संघटनात्मक स्थिती, उपलब्ध पक्षबळ, कार्यकर्त्यांचे जाळे आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या पक्षबांधणीवर बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे पुढील काळात या सातही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हालचाली अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. संभाव्य उमेदवारांना आतापासून तयारीला लागण्याचे आदेश मिळण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबईतील बैठकीत संघटनात्मक आढावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, सरचिटणीस आमदार रोहित पवार आणि जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, किरण राजपूत, युवक अध्यक्ष विनायक पाटील, गिरीश सांगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा, तर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी जळगाव शहरातील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा सादर केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
रोहित पवारांचाही सप्टेंबरमध्ये दौरा
शरद पवारांच्या ३० ऑगस्टच्या दौऱ्यानंतर सप्टेंबरमध्ये आमदार रोहित पवार हे देखील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचा सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचे दौरे वाढणार असून, पक्षबांधणीला गती देण्याची तयारी सुरू झाली आहे. बैठकीसस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसोबतच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटन मजबूत करण्याचे आव्हान पक्षासमोर असून, शरद पवारांच्या जळगाव दौऱ्यातून या तयारीला नेमकी कोणती दिशा मिळते, याकडे जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.
