जळगाव : महाराष्ट्रात एकेकाळी भाजपचे राजकीय अस्तित्व मर्यादित होते. मात्र, पक्ष तळागाळात रुजविण्यासाठी ज्या लोकांनी सातत्याने मेहनत घेतली, त्यात प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांची यादी प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जिल्ह्यातील कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथे रविवारी केले.

एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त कोथळीत आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. खडसेंच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा आढावा घेताना पवार यांनी त्यांच्या विधिमंडळातील कामगिरीपासून महाराष्ट्रातील भाजपच्या विस्तारातील योगदानापर्यंत अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. विशेष म्हणजे, राजकीय मतभेद बाजूला ठेवून पवार यांनी खडसे यांच्या भाजपमधील योगदानाचे केलेले कौतुक हे कार्यक्रमातील महत्त्वाचे राजकीय वक्तव्य ठरले. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचे स्थान आजच्या तुलनेत पूर्वी मर्यादित होते. त्या काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी अनेक नेत्यांनी तळागाळात काम केले. प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पवार यांनी सांगितले. खडसे यांनी केवळ निवडणुका लढविण्यापुरते राजकारण न करता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि ग्रामीण भागात भाजपची मुळे घट्ट करण्यासाठी काम केले. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या विस्ताराचा इतिहास लिहिताना खडसे यांचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही, असा संदेश पवार यांच्या वक्तव्यातून मिळाला.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या विधिमंडळातील कार्यकाळाची आठवण सांगताना शऱद पवार यांनी स्वतःच्या विधानसभेतील सुरुवातीच्या काळाचा संदर्भ दिला. आपण १९६७ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत निवडून आलो. त्यानंतर विधानसभेत जनतेच्या प्रश्नांवर तळमळीने आणि प्रभावीपणे बोलणाऱ्या सदस्यांकडे आपले विशेष लक्ष असायचे, असे पवार म्हणाले. त्यावेळी दोन सदस्यांची भाषणे आपण आवर्जून ऐकत होतो आणि त्यापैकी एक एकनाथ खडसे होते, असे त्यांनी नमूद केले. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न खडसे यांनी विधिमंडळात विरोधी बाकावर बसून सातत्याने आक्रमकपणे मांडले. प्रश्नांची मांडणी करताना त्यांची तळमळ आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे ते वेगळे ठरत होते, असे पवार यांनी सांगितले.

एकावेळी १२ खाती सांभाळणारा मंत्री

एकनाथ खडसे यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेचाही शरद पवार यांनी आवर्जून उल्लेख केला. महायुती सरकारमध्ये एकाचवेळी तब्बल १२ खात्यांची जबाबदारी सांभाळणारे खडसे हे एकमेव मंत्री होते, असे त्यांनी सांगितले. अनेक महत्त्वाची खाती एकाचवेळी सांभाळताना प्रशासनावर पकड ठेवणे आणि विविध विभागांशी संबंधित प्रश्न हाताळणे ही सोपी बाब नव्हती. मात्र, खडसे यांनी दीर्घकाळ राज्याच्या राजकारणात सक्रिय राहून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली, असे पवार यांनी नमूद केले. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये दीर्घकाळ काम केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जनतेचे प्रश्न सरकारकडे मांडण्यासाठी त्यांच्यासारख्या लोकांची गरज असल्याचे लक्षात ठेवून आम्ही त्यांना विधान परिषदेवर संधी दिली, असेही पवार म्हणाले.

स्थानिक आमदार, मंत्र्यांची अनुपस्थिती

एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच रक्षा खडसे, खासदार भास्कर भगरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित होते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदारांसह जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीचीही शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, तेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.