जळगाव : निवडणुकांच्या वेळी उमेदवारांना आवश्यक रसद पुरविण्यात पक्ष कमी पडतो. शरद पवारांनी अनेक नेते वाढवले; मात्र त्याप्रमाणात रसद वाढवली नाही, अशी कबुली देत रसदीच्या बळावर वाढलेले काही जण सत्ताबदल होताच दुसऱ्या पक्षात गेल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी येथे व्यक्त केली.

पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासह नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मंगळवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्याठिकाणी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी मार्गदर्शन केले. राज्यात २०२९ मध्ये शरद पवार गटाशिवाय सत्ता स्थापन होणार नाही. जळगाव जिल्ह्यातही निम्मे आमदार शरद पवार गटाचेच असतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

जळगाव हा शरद पवारांना सर्वात जास्त मानणारा जिल्हा आहे. त्यांनी याठिकाणी अनेक खासदार आणि आमदार घडवले. परंतु, अनेक लोक पक्षाच्या जीवावर मोठे झाले आणि संघर्षाच्या काळात सोडून गेले. पक्ष भविष्यात काय करेल, अशी चिंता असतानाही सामान्य कार्यकर्ते मात्र पवारांशी आजही एकनिष्ठ आहेत. प्रत्येक वेळी आपण यशस्वी झालो पाहिजे, असे कुठे विधिलिखित नाही. परंतु, आपले कर्तृत्व आणि नेतृत्व दाखविल्यावर आपल यशस्वी होऊ शकतो, हे सिद्ध करावे लागते. कोणीही ताम्रपट घेऊन आलेले नाही. निवडून येण्याची रणनिती, प्रत्येक वेळा बदलण्याची परिस्थिती आणि त्या पद्धतीचे राजकारण, निवडून कशा पद्धतीने आले पाहिजे यासाठी यंत्रणेचा वापर यामुळे काही लोक सत्तेमध्ये बसत आहेत. मात्र, लोकांमध्ये ज्यावेळी उद्रेक आणि उठाव होईल त्यावेळी निश्चितपणे इतिहास घडेल, या एका आशेवर शरद पवार गट काम करणार असल्याचे शशिकांत शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादीत यापुढे तरुणांना संधी

जनतेत सरकारविषयी मोठी नाराजी असली तरी त्यांना मते मिळतात, यावर संशोधन केले पाहिजे. महायुती किंवा महाविकास आघाडीत फार काही व्यवस्थित चालले नाही. प्रत्येक जण पद घेताना आपल्या सोयीनुसार भूमिका घेतो. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची खालच्या पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी होत नाही. परिणामी, निवडणुकांमध्ये अपयशाला तोंड द्यावे लागते, याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले. पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. ज्या जागा पक्ष लढवणार आहे, त्यांचा अभ्यास आताच करुन ठेवा. सर्वच्या सर्व जागा लढविण्याच्या भानघडीत पडू नका. कार्यकर्ता निवडणूक लढविण्यासाठी उत्साही असतो. मात्र, त्यामुळे सर्व शक्ती विभागली जाते. आतापासूनच कामाला लागून निवडून येण्याची शक्यता असलेल्या जागा आघाडीमध्ये पक्षाला सुटल्या किंवा नाही सुटल्या तरी लढविण्यासाठी कार्यकर्त्यांना तयारी लागण्याच्या सूचना शिंदे यांनी बैठकीत दिल्या. राष्ट्रवादीत यापुढे तरुणांना संधी देण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

नुसती पदे भूषविणारे बाजूला करणार

यापुढील काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाच पक्ष असला पाहिजे. जेवढ्या त्वेषाने कार्यकर्ता काम करतो, त्या त्वेषाने नेत्यानेही काम केले पाहिजे. जे काही पदाधिकारी राज्यस्तरावर किंवा जिल्हास्तरावर काम करतात, त्यांची यादी कार्यकर्त्यांना देणार आहे. राज्यावर काम करणारे जिल्ह्यावर आणि जिल्ह्यावर काम करणारे तालुक्यावर काम करत नसतील तर त्यांना पक्षाकडून बाजूला केले जाईल, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. यावेळी जळगाव जिल्ह्याचे प्रभारी सुनील भुसारा, निरीक्षक भास्करराव काळे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, युवक जिल्हाध्यक्ष जयेश चौधरी, महानगर अध्यक्ष एजाज मलीक, माजी खासदार ईश्वर जैन, माजी आमदार बी.एस.पाटील, श्रीराम पाटील, शशिकांत साळुंखे, सचिन पाटील, अशोक लाडवंजारी, संग्रामसिंग सूर्यवंशी आदी उपस्थित होते.