लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात रस्त्यांची माहिती देण्यासाठी शहरात बसविलेल्या कमानींवरील पथदर्शक फलकांच्या पत्र्यांची स्थिती धोकादायक असल्याची बाब गडकरी चौकात वाऱ्यामुळे कोसळलेल्या पत्र्यांमुळे समोर आली आहे. अतिशय वर्दळीच्या रस्त्यावरील पथदर्शक फलकाचे पत्रे कोसळले. रस्त्याने जाणारे वाहनधारक व पादचारी नागरिक थोडक्यात बचावले. महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी मात्र अशी काही घटना घडली नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिका नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी तयारी करीत आहे. धोकादायक वाडे व घरांना नोटीसा दिल्या जात आहेत. दुसरीकडे रस्त्यांवरील स्वत:च्या कमानींवरील निखळण्याच्या बेतात असणाऱ्या पत्र्यांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर जाहिरात फलकांचा विषय ऐरणीवर आला. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकसह अन्य शहरांतील फलकांबाबत दक्षता घेण्याची गरज मान्सूनपूर्व आढावा बैठकीत मांडली होती, जाहिरात फलकांचे आकारमान निश्चित केले आहे. शहरात उभारलेल्या फलकांचा आकार प्रमाणित असेल, याकडे लक्ष द्यावे. त्यांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. महापालिकेने फलकांचे आकारमान व तत्सम कारणावरून ६० जणांना नोटीस बजावली आहे. यातील तीन फलक काढण्यात आल्याचे सांगितले जाते. असे असताना महापालिका स्वत:च्या कमानी, त्यावरील दिशादर्शक फलक व तत्सम मालमत्तांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करते की नाही, असाही प्रश्न गडकरी चौकातील घटनेमुळे उपस्थित झाला.

आणखी वाचा-नाशिक विभागीय आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम

गडकरी चौक हा अतिशय वर्दळीचा परिसर आहे. दोन दिवसांपूर्वीी ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. वाऱ्यामुळे पत्रे थेट रस्त्यावर कोसळले. वाहनधारक वा पादचारी थोडक्यात बचावले. सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर पर्यटकांना रस्त्यांची माहिती देण्यासाठी कमानी उभारून फलक लावले गेले. शहरात शेकडो कमानी आहेत. त्यावरील पत्र्यांची स्थिती गडकरी चौकातील घटनेवरून उघड झाली. अनेक रस्त्यांवरील हे फलक दुर्घटनेचे कारण ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बऱ्याच वेळा या कमानींवर अवैधपणे शुभेच्छा फलक लावले जातात. या संदर्भात मनपाचे विभागीय अधिकारी योगेश रकटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाशिक पश्चिम विभागात फलकावरील पत्रे कोसळण्याची कुठलीही घटना घडली नसल्याचा दावा केला. यामुळे मनपाच्या कार्यशैलीवर प्रकाश पडला आहे.