जळगाव – जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती व्हावी म्हणून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील प्रयत्न करत असताना, त्यांच्याच पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळाची भाषा केली आहे. तेवढ्यावरच न थांबता शिवसेना आणि मित्र पक्षांना संपवायचं, ही भाजपची पॉलिसी असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी आता केला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढलेल्या भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात यापूर्वी चांगला संवाद आणि समन्वय दिसून येत होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागताच तिन्ही पक्षांमधील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. विशेषतः भाजपकडून स्वबळावर लढण्याची भूमिका घेण्यात येत असल्याने शिंदे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होते, तशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये का नाही ? असा प्रश्न शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच युती झाली नाही तर कार्यकर्ते मरून जातील, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केवळ सत्तासमीकरणांचे नाही, तर महायुतीच्या अस्तित्वाचेही कसोटीसमान रणांगण ठरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, शिंदे गटाचे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आमदार किशोर पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील युतीसाठी प्रयत्न करत असताना, त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आमदार पाटील यांनी पहिले पाऊल टाकले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली पाहिजे, हे नेत्यांचे वैयक्तिक मत आहे. मात्र, पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिंदे गट कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक सवबळावर लढणार असल्याची थेट घोषणा त्यांनी केली आहे. माझ्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढणारी बहीण वैशाली सूर्यवंशी, दिलीप वाघ, प्रताप पाटील आणि अमोल शिंदे यांच्या बरोबर राहून मी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढू शकत नाही.
पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांकडून मृत्यू ओढवून घेण्यापेक्षा समोरून त्यांच्याशी लढणे केव्हाही चांगले. किमान सावध तरी राहता येईल, असेही विधान आमदार पाटील यांनी केले आहे. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांना प्रत्युत्तर देताना भाजपने त्यांच्यासाठी आमची दारे केव्हाही खुली असतील, असा सावध पवित्रा आता घेतला आहे. मात्र, पाटील यांनी भाजपवर अविश्वास दर्शवित शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि मित्र पक्षांना संपविणे हीच भाजपची पॉलिसी असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
तसेच जेवढ्या काही ठिकाणी सध्या शिंदे गटाचे आमदार आहेत, त्याठिकाणी गोड बोलून त्यांची माणसे पेरण्याचे काम भाजप करत आहे. मागील विधानभा निवडणुकांचे अनुभव लक्षात घेता त्यांच्यावर यापुढील काळात विश्वास ठेवणे म्हणजे विषाची परीक्षा घेण्यासारखे असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
