धुळे, जिल्ह्यातील शिरपूर येथे असलेल्या दि शिरपूर मर्चंट को-ऑप बँकेतील तब्बल १३ कोटी ७५ लाख ७६ हजार २५३ रुपयांच्या अपहार प्रकरणी धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील मुख्य संशयित म्हणून बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक संजय कुलकर्णी याला अखेर अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे २०२५ रोजी दि. शिरपूर मर्चंट को-ऑप बँक लि. शिरपूरचे लेखापरीक्षक यांनी तक्रार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ च्या कलम ३ सह अन्य गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, बँकेचे एकूण ४६ अधिकारी, कर्मचारी, चेअरमन आणि कर्जदार यांनी संगनमत करून तब्बल १३ कोटी ७५ लाख ७६ हजार २५३ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. या गैरव्यवहारामुळे बँकेचे सभासद आणि ठेवीदार यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल होताच संबंधित संशयित फरार झाले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशान्वये या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी विश्वजीत जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणातील संशयितांनी अटक टाळण्यासाठी धुळे जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र दोन्ही न्यायालयांनी त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांचा शोध घेत असताना आज (दि. १) या गुन्ह्यातील मुख्य संशयित संजय केशवराव कुलकर्णी याचा शिरपूर येथे ठावठिकाणा लागला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. कुलकर्णी हा दि. शिरपूर मर्चंट को-ऑप बँक लि. शिरपूर येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. तो दगडी आड चौक, बालाजी मंदिरामागे, वरचेगाव, शिरपूर येथील रहिवासी आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे करीत आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, पोलीस उपनिरीक्षक सविता गवांदे तसेच पोलीस अंमलदार रविंद्र माळी, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गणेश खैरनार आणि विलास पाटील यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असून, अपहार झालेल्या रकमेचा मागोवा घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे बँकेचे सभासद, ठेवीदार आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रकरणातील इतर संशयितांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
