नाशिक : मुंबईतील दसऱ्या मेळाव्याला निघालेल्या शिंदे गटातील समर्थकांना नाशिक-मुंबई महामार्गावरील खर्डी येथे ठाकरे गटातील महिलांनी वाहन थांबवून चोप दिला. मद्यधुंद अवस्थेत संबंधितांकडून हातवारे केले जात होते. त्यामुळे महिलांनी त्यांची जीप रोखली आणि चोप दिल्याचे शिवसेनेच्या शहर समन्वयक श्रध्दा दुसाने यांनी सांगितले.शहरातील शिवसेना (ठाकरे) गटातील महिला दुपारी बसमधून मुंबईतील मेळाव्यासाठी निघाल्या होत्या. कसारा घाट ओलांडल्यानंतर बस पुढे गेली.

यावेळी महामार्गावरून शिंदे गटाची जीप बससोबत समांतरपणे जात असताना जीपमधील शिंदे गटाच्या समर्थकांनी बसमधील महिलांकडे पाहून विचित्र हातवारे केले. शिवीगाळ केली. खिडकीत बसलेल्या महिलांना ही बाब लक्षात आली. त्यांनी बस चालकाच्या मदतीने खर्डी येथे संबंधितांची जीप रोखली. या जीपवर शिंदे गट मेळाव्याचे पत्रक चिकटविलेले होते. संतप्त महिलांनी जीपमधील चार ते पाच जणांना चोप दिला. ते सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते, असे दुसाने यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात मेळाव्यास निघालेले शिवसैनिकही महिलांच्या मदतीला धाऊन आले. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार असल्याचे दुसाने यांनी सांगितले.