नाशिक : करोना काळात उत्तर प्रदेशमध्ये मृतांचे पार्थिव रस्त्यावर होते. तसेच त्यांचे दहन केले जात होते. उत्तर प्रदेशातील करोना काळातील स्थितीची तुलना मुंबई, महाराष्ट्रातील प्रारुपाशी होऊ शकते का, असा प्रश्न करीत करोना काळात उत्तर प्रदेशातील प्रशासन असे का होते, याचे उत्तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी द्यावे, असे आव्हान शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले.
महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेची युती जाहीर केल्यानंतर स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांना हादरे बसले. निवडणूक नियोजनात सहभागी असणारे ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये सहभागी झाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला. उमेदवारी अर्ज भरण्यास अल्पसा कालावधी असल्याने आधी खासदार अनिल देसाई आणि ज्येष्ठ नेते रवींद्र मिर्लेकर हे नाशिकमध्ये दाखल झाले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी आदित्य ठाकरे हे देखील नाशिकमध्ये आले. तपोवनला भेट दिल्यानंतर त्यांंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महापालिका निवडणूक प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या संदर्भातील प्रश्नावर ठाकरे यांनी करोना काळातील उत्तर प्रदेशमधील स्थितीवर बोट ठेवले. करोना काळात उत्तर प्रदेशमध्ये बिकट स्थिती होती. पार्थिव रस्त्यावर पडेलेले होते. त्यांचे तसेच दहन केले जात होते. करोना काळात उत्तर प्रदेशमधील प्रशासकीय व्यवस्था अशी का होती, हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.
तेव्हाची उत्तर प्रदेशमधील स्थिती आणि मुंबईसह महाराष्ट्रात हाताळललेली स्थिती यांंची तुलना होऊ शकत नाही. मागील दहा वर्षात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये मुंबई्च्या जवळपास पोहोचू शकेल, असे घडवलेले एखादे शहर दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. अत्याचार प्रकरणातील कुलदीपसिंग याला नुकतेच सोडण्यात आले. असे प्रशासन ते चालविणार आहेत का, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.
ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांना भाजप प्रवेशासाठी कार्यालयात दोन तास प्रतिक्षा करावी लागली होती. भाजप कार्यालयाचे ‘तापोवन’ झाले होते. आयारामांमुळे भाजपचे कित्येक वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्यांविषयी वाईट वाटते. मेहनत करणाऱ्यांचे भवितव्य अधांतरी बनले. भ्रष्टाचारी लोकांना पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवले जात असून अखेरीस त्यांना नोटाचा पर्याय स्वीकारावा लागेल, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले. ठाकरे गटातून बाहेर पडणारे पक्षाचे नेते भेटत नसल्याचा सूर आळवत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी भाजपमध्ये जाणाऱ्यांना आता रोज दिल्लीला भेटीसाठी जाण्याची रेल्वे मिळणार असल्याचा टोला हाणला. ईडी. सीबीआय, वॉशिंग मशीन ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे भ्रष्टाचारी जात आहे. अशी मंडळी दूर झालेली बरी, असेही ठाकरे यांनी सांगितले.
