जळगाव : “जुन्या काळातील सहकार क्षेत्रातील माणसे साधी-भोळी होती. मात्र मी भोळा नाही. मी जर भोळा राहिलो असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकले असते,” असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी शहरातील एका कार्यक्रमात केले. सहकार क्षेत्रातील जुन्या आणि नव्या कार्यपद्धतीतील बदलांचा संदर्भ देताना पाटील यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरली. आपल्या खास शैलीत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना टोला लगावला.
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत जे. टी. महाजन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी दिवंगत महाजन यांच्या साध्या राहणीमानाच्या आठवणी सांगत त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचेही कौतुक केले. आम्ही लहान असताना जे. टी. महाजन यांना पाहायचो. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. त्यांना पाहिल्यावर एखादा शेतकरीच आपल्यासमोर आला आहे, असे वाटायचे. आज एका शेतकऱ्याच्या पुतळ्याचे अनावरण एका शेतकरी पुत्राच्या हस्ते होत असल्याचा आपल्या अभिमान आहे. महाजन यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करताना त्यांच्या साधेपणासोबतच संस्थात्मक बांधणीतील योगदानही महत्त्वाचे असल्याचे मंत्री पाटील यांनी नमूद केले. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचे काम त्या काळातील नेतृत्वाने केल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचा विश्वास जपला पाहिजे
सहकार क्षेत्रातील प्रवेशाबाबत गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सुरुवातीला सहकार क्षेत्रात काम करण्याचा माझा विचार नव्हता. मात्र संजय पवार आणि चिमणराव पाटील यांच्या आग्रहामुळे आपण या क्षेत्रात आलो. सहकारी संस्थेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रत्येक निर्णयाचा विचार करूनच त्यावर स्वाक्षरी करावी लागते, असे त्यांनी स्पष्ट केले. मी स्वतःसाठी भत्ताही घेत नाही. शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांचा हा विश्वास जपला पाहिजे. सत्तेत राहण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे सत्तेची निष्ठा राखून सहकारी संस्था व्यवस्थित चालविण्याची जबाबदारीही त्यांनी अधोरेखित केली. सहकारी संस्थांच्या कामकाजावर भाष्य करताना पाटील यांनी केवळ कार्यक्रम आणि उद्घाटनांपुरते काम मर्यादित न ठेवता संस्थांची आर्थिक आणि प्रशासकीय स्थिती सुधारण्याची गरज व्यक्त केली. जनतेने आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या संस्था व जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्या पाहिजेत. जळगावमधील बेलगंगा, वसाका यासारखे अनेक कारखाने बंद आहेत; मात्र खासगी कारखाने जोरात सुरू आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दूध संघाची आवक मुंढेंमुळे वाढली
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या कामाचा उल्लेख करताना पाटील यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचा संदर्भ दिला. एक तुकाराम मुंढे आले आणि इकडे दुधाची आवक वाढली. आता पनीरही सापडत नाही, एवढी मागणी निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. दूध संघाच्या प्रगतीत शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असून, दूध उत्पादकांचा विश्वास कायम राखण्यासाठी संस्थेने पारदर्शक आणि शेतकरी केंद्रीत कामकाज करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण तसेच आमदार सुरेश भोळे, अमोल जावळे, नंदकिशोर महाजन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे आदी उपस्थित होते.
