नाशिक : अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संघटनात्मक नेमणुकीवरून पक्षांतर्गत अस्वस्थता उघड करणारे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी बुधवारी पत्रकार परिषदेत संवाद साधत असताना खा. संजय राऊत यांचा फोन आला आणि क्षणार्धात बडगुजर यांच्या हकालपट्टीची घोषणा करण्यात आली.
खा. संजय राऊत नाशिकमध्ये असताना उपनेते बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना होती. राजकीय चर्चा बंद दाराआड होते. मी उघडपणे भेट घेतल्याचा दावा बडगुजर यांनी केला होता. पक्षात संघटनात्मक बदल करताना विचारात न घेतले नाही. महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह १० ते १२ जण नाराज आहेत. अनेकदा हा विषय मांडूनही पक्षाकडून निर्णय होत नसल्याने अस्वस्थता असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेली हजेरी आणि ठाकरे गटाचे उपनेते बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकाच दिवशी घेतलेली भेट, या घटनाक्रमाने महायुतीकडून ठाकरे गटाला पुन्हा नाशिकमध्ये धक्का देण्याची मोर्चेबांधणी झाल्याचे समोर आले.
या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते आदी पदाधिकाऱ्यांची बुधवारी पत्रकार परिषद झाली. संघटनात्मक बदलाविषयी बडगुजर यांनी कधीही नाराजी प्रगट केली नसल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला. बडगुजर हे अजूनही आमच्या पक्षात असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात असताना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांना खा. संजय राऊत यांचा फोन आला आणि पत्रकार परिषदेचे सर्व चित्र पालटले. खा. राऊत यांच्या निर्देशानुसार जिल्हाप्रमुख सूर्यवंशी यांनी उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्याचे जाहीर केले. महत्वाची बाब म्हणजे, या पत्रकार परिषदेस महानगरप्रमुख विलास शिंदे उपस्थित होते. दरम्यान, सुधाकर बडगुजर हे खा. संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यांचीच हकालपट्टी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.