धुळे : शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले असताना, पांझरा नदीकाठचा महत्त्वाचा शिवाजी रोड लवकरच काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून नव्या स्वरूपात साकारला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची तयारी सुरु झाली असून, सुमारे चार कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी खर्च केला जाणार आहे. त्यामुळे शिवाजी रोडवरील दैनंदिन वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरात अमृत योजनेसह विविध विकासकामांच्या माध्यमातून अनेक अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र काही प्रमुख मार्ग अद्यापही दुर्लक्षित राहिले असून, त्यात शिवाजी रोडचा समावेश आहे. पांझरा नदीकिनारी असलेला हा रस्ता खड्ड्यांमुळे पूर्णपणे उखडला असून, पावसाळ्यात त्याची अवस्था अधिकच बिकट होते. या मार्गावरून एसटी बसेस, मालवाहू वाहने तसेच खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. शहरातील मुख्य बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी अनेक वाहनचालक शिवाजी रोडचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करतात. मात्र अलीकडे झालेल्या काही कमांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आणि लहान मोठ्या काही वाहनांचे नुकसानही झाले.या पार्श्वभूमीवर महापालिकेने शिवाजी रोडच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेतला आहे. सुमारे एक किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. शिवतीर्थ ते गणपती मंदिर, गणपती मंदिर ते कालिका माता मंदिर आणि कालिका माता मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर अशा टप्प्यांत कामाचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्यावर भर देण्यात आला आहे.

शिवाजी रोड काँक्रिटीकरण प्रकल्पासाठी चार कोटी रुपयांहून अधिकचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. हा रस्ता शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत कळीचा असल्याने, काम दर्जेदार व टिकाऊ व्हावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर खड्ड्यांमुळे होणारा त्रास कमी होईलच, शिवाय पावसाळ्यातील जलसाचाही प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुळेकरांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाचा मार्ग उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामादरम्यान वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शिवाजी रोड हा पर्यायी मार्ग म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरला जात असल्याने, काम सुरू असताना वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी पर्यायी मार्गांची पूर्वतयारी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सूचना फलक, दिशादर्शक आणि रात्रीच्या वेळी पुरेसे प्रकाशयोजनांची व्यवस्था करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेच्या वतीने हे काम ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, निकृष्ट कामाला मुळीच थारा दिला जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. काँक्रिटीकरणासोबतच पाणी निचरा व्यवस्था, कडेला संरक्षक भिंत तसेच आवश्यक ठिकाणी पदपथाची सुविधाही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कामामुळे परिसरातील नागरिक, व्यापारी तसेच दररोज या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना दीर्घकालीन दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.