लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध घटकांसाठी घेतलेले निर्णय आणि शेतकरी हिताच्या राबविलेल्या योजना यांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शहरात विभागनिहाय शिवदुतांची नेमणूक करण्यात येणार आहे. शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून शिवदूत त्यांना त्यांचा लाभ घेण्यास मदत करणार आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेना महानगर पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. यावेळी शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या महत्वाकांक्षी योजनाबद्दलही माहिती यावेळी देण्यात आली. विभागनिहाय शिवदूत नेमण्याची सूचना करण्यात आली. हेही वाचा. कपाशी लागवड चक्क वाजतगाजत; शेतकर्याचा नादच खुळा महाराष्ट्र शासनाने नुकतीच शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा संरक्षण देण्याचे जाहीर करून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी का होईना दिलासा मिळणार असल्याचे भुसे म्हणाले. यासोबत 'शासन आपल्या दारी' योजनेंतर्गत शेतकऱ्यांसह छोटे-मोठे उद्योग, व्यवसायासाठी देखील सरकार विविध वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करून मदत करत आहे. याचा लाभ सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट, यासह अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना होणार आहे. हेही वाचा. नाशिक: शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद; निमा अध्यक्षांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध महिला बचत गटांसाठी त्यांच्या हक्काचे हाट बाजार ही संकल्पना देखील नाशिक मनपा हद्दीत अमलात आणली जाईल. जेणेकरून महिला बचत गटांना त्यांची उत्पादने, खाद्य पदार्थ विक्रीसाठी हक्काचे ठिकाण मिळणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या जागेसंदर्भात लवकरच मनपा आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे भुसे यांनी म्हटले आहे. बैठकीला सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, उपजिल्हाप्रमुख शाम साबळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक मनपा हद्दीत लवकरच शिवदूतांची नेमणूक करण्यात येणार आहे. या शिवदूतांमार्फत सरकारी योजना आणि त्यांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यास मदत करण्यात येणार आहे. यासह अनेक अशा महत्वाकांक्षी शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासंदर्भात शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. - अजय बोरस्ते (जिल्हाप्रमुख, शिवसेना)