धुळे: लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदेत उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पासह धुळे जिल्ह्यातील विविध प्रलंबित रेल्वे प्रश्न जोरदारपणे मांडले. या वेळी त्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला देत प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली, तसेच धुळे–मुंबई, धुळे–पुणे रेल्वे सेवा आणि वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यावरही भर दिला.
गेल्या चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेला मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्प सुमारे ३०९ किमी लांबीचा असून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सहा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील नाशिक व धुळे तसेच मध्यप्रदेशातील धार, खरगोन, बडवानी आणि इंदूर या जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार आहे. सुमारे १८,०३६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात ३० नवीन रेल्वे स्थानकांची उभारणी प्रस्तावित आहे.मात्र, भूसंपादन प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणींमुळे गेल्या वर्षापासून प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी मोबदला दिला जात असल्याच्या तक्रारींमुळे अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत.
रेडी रेकनरपेक्षा अधिक मोबदला द्या
औद्योगिक जमिनी, एन.ए. क्षेत्र, फळबागा, विहिरी, पाइपलाईन व ठिबक सिंचन यांचे योग्य मूल्यांकन न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बच्छाव यांनी संसदेत ठाम भूमिका मांडत शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या किमतीपेक्षा चार ते सहा पट मोबदला देण्याची मागणी केली. तसेच भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष जनसुनावण्या आयोजित कराव्यात, अधिकृत अलाईनमेंट जाहीर करून नागरिकांमधील संभ्रम दूर करावा आणि प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र पुनर्वसन धोरण राबवण्याची मागणी करताना त्यांनी शिक्षणात सवलती, नोकऱ्यांमध्ये प्राधान्य तसेच उद्योजकतेसाठी आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव मांडला. संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी महसूल अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्याचीही त्यांनी मागणी केली. यासोबतच खासदारांनी धुळे जिल्ह्यातील रेल्वे सेवांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले.
धुळे – पुणे एक्सप्रेस सुरु करा
कोविड काळापासून बंद असलेली धुळे–पुणे कॉम्पोझिट एक्सप्रेस तातडीने सुरू करण्याची मागणी करताना, ही सेवा विद्यार्थ्यांसाठी, नोकरीधारकांसाठी आणि रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच धुळे–मुंबई दरम्यान रात्रीची स्वतंत्र एक्सप्रेस सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. सध्या रात्रीच्या प्रवासासाठी रेल्वे सुविधा नसल्यामुळे नागरिकांना खासगी बस व ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहावे लागत असून आर्थिक भार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे – मुंबई मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस हवी
आधुनिक, वेगवान आणि अत्याधुनिक सुविधा असलेली वंदे भारत एक्सप्रेस धुळे–मुंबई मार्गावर सुरू करण्याची मागणी करत त्यांनी यामुळे उद्योग, शिक्षण आणि व्यापार क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. इतर मागण्यांमध्ये नाशिक–पुणे रेल्वे मार्ग नारायणगाव मार्गे विकसित करणे, नाशिक–धुळे नवीन रेल्वे मार्ग उभारणे, नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करणे तसेच लासलगाव किंवा नरडाणा येथे कृषी मालवाहतूक टर्मिनल उभारण्याचा समावेश आहे.
एकूणच, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी संसदेत मांडलेल्या या मुद्द्यांमुळे उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला नवे परिमाण मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, या मागण्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
