नंदुरबार – अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी घाटात रविवारी झालेल्या अपघातातील शालेय बसची फिटनेस मुदत दोन महिन्यांपूर्वीच संपलेली असल्याचे उघड झाले आहे. चाळीसगावमध्ये एका राजकीय पक्षाचा माजी नगरसेवक असल्यानेच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू होऊनही आतापर्यत या प्रकरणात फक्त बस चालकावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी आणि आसपासच्या परिसरातून आदिवासी विद्यार्थ्यांना घेऊन अक्कलकुव्याकडे जाणारी शालेय बस आमलीबारीजवळ दरीत कोसळून रविवारी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अपघातात ५४ हुन अधिक विद्यार्थी जखमी झाले. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे येथील आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनुदानीत आश्रमशाळेत या विद्यार्थ्यांना नेण्यात येत होते. अपघातग्रस्त बस एमच १५ एके १४५९ हिची फिटनेस ही सप्टेंबर २०२५ मध्येच संपल्याचे उघड झाले आहे.

मुळातच जर बसची फिटनेस संपली होती, तर ती रस्तावर धावलीच कशी, हा प्रश्न आहे. त्यामुळेच बसची फिटनेस न करताच या संस्था चालकाने थेट विद्यार्थ्यांच्या जीवाशीच खेळल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर पोलिसांनी फरार चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदवला आहे. मात्र या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचेही उघड झाले आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांसह ५६ जण होते, असे सांगितले जात आहे.याबाबत अद्याप कुठलाही गुन्हा दाखल का झाला नाही, हा प्रश्न आहे. पोलिसांनी या बसची सर्व कागदपत्रे जमा करण्याचे संबंधितांना आदेशीत केले आहे. मुळातच संस्था चालकाने विद्यार्थ्यांना आणण्यासाठी दोन बस आणि एक मालमोटार पाठवल्याचे उघड झाले आहे. मालमोटारीतही विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने कोंबून वाहतूक सुरु होती. मात्र अपघातानंतर संबंधीत मालमोटार देवगोई घाटात अडवून त्यातील विद्यार्थ्यांना पालकांनी उतरवून घेत घरी नेले.

चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे येथील या अनुदानीत आश्रमशाळेचा संस्था चालक हा एका सत्ताधारी पक्षाचा माजी नगरसेवक असल्याचे म्हटले जाते. यातूनच राजकीय दबावातून या संस्था चालका विरोधात अद्यापही कारवाई करण्यात आली नसल्याची चर्चा आहे. मुळातच या संपूर्ण प्रकरणात आदिवासी विकास विभागाची भूमिका महत्वाची असतांना त्यांच्याकडून मौन बाळगले गेले. मेहूणबारे परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांची क्षमताच आणि संख्या नसताना संबंधीत संस्था चालकाला नंदुरबारहून विद्यार्थी घेऊन जाऊन शाळेची मान्यता टिकवावी लागत आहे. मग संबंधीत आश्रमशाळेला विभागाचे अनुदान आणि मान्यता कशी मिळते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.