लोकसत्ता विशेष प्रतिनिधी नाशिक : शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना नाशिक महापालिकेने चाचणी संचाचे नियोजन करण्यात उदासिनता कायम ठेवल्याने जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळेकडे ग्रामीण भागातील रुग्णांच्या तपासणीसाठी उपलब्ध झालेले सर्व संच संपुष्टात आले आहेत. नव्याने उपलब्ध झालेल्या संचामार्फत शहरातील प्रलंबित चाचण्या शनिवारपर्यंत पूर्ण केल्या जातील. तथापि, पुढील नमुने तपासणीसाठी नाशिक महापालिकेने चाचणी संच खरेदी करून प्रयोगशाळेला उपलब्ध करावेत, असे निर्देश आरोग्य विभागाच्या बैठकीत देण्यात आले. खासगी रुग्णालयांना परस्पर प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यास चाप लावला गेला. शहरात डेंग्यूचा उद्रेक झाला असताना महापालिकेची उदासिनता पुन्हा उघड झाली आहे. डेंग्यूबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्यासह जिल्हा हिवताप, सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ, साथरोग तज्ज्ञ उपस्थित होते. आणखी वाचा-Video: नाशिकमध्ये मिरवणुकीने स्वागत होणारा सराईत गुन्हेगार पुन्हा कारागृहात बैठकीत चाचणी संचांच्या तुटवड्यावर चर्चा झाली. उपसंचालकांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून १५ डेंग्यू चाचणी संच प्राप्त झाले आहेत. त्यातून सुमारे १३०० संशयितांची चाचणी करणे शक्य होईल. गुरुवारी आणि शुक्रवारी ५६० डेंग्यू चाचण्या झाल्या. महापालिकेच्या अंतर्गत प्रलंबित डेंग्यू चाचण्या शनिवारपर्यंत पूर्ण करण्यात येतील. राज्य स्तरावरून ग्रामीण भागातील लोकसंख्येचा विचार करून जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळेसाठी चाचणी संच प्राप्त होतात. निकषानुसार आतापर्यंत दुप्पट चाचणी संच प्राप्त झाले. यातील बहुतांश संच नाशिक शहरातील रुग्णांसाठी वापरले गेले. ग्रामीण भागातील रुग्णांच्या तपासणीसाठी संचही उपलब्ध नसल्याचा मुद्दा बैठकीत मांडला गेला. महापालिककडे पायाभूत सुविधा असूनही त्यांनी डेंग्यू चाचण्यांसाठी व्यवस्था उभारली नाही. डेंग्यूचे संचही जिल्हा प्रयोगशाळेला उपलब्ध केले नाही. खासगी रुग्णालयातील नमुने महापालिकेमार्फत येणे क्रमप्राप्त होते. मात्र मनपाने खासगी रुग्णालयांना अर्ज दिला. त्यामुळे ही रुग्णालये सरसकट जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळेकडे नमुने पाठवत आहेत. डेंग्यू चाचणीचे संच प्रयोगशाळेकडे अतिशय मर्यादित स्वरुपात आहेत. त्यामुळे आता या चाचण्या करावयाच्या असतील तर मनपाने चाचणी संच खरेदी करून प्रयोगशाळेला ते उपलब्ध करावेत, अशी सूचना करण्यात आली. खासगी रुग्णालयांनी थेट जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळेत नमुने पाठवू नयेत, मनपाच्या यंत्रणेमार्फत हे नमुने पाठविण्याचे सूचित करण्यात आले. जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळेतील सुक्ष्मजीवशास्त्र हे पदही रिक्त आहे. त्याचा अतिरिक्त कार्यभार मालेगाव येथील सुक्ष्मजीवशास्त्रज्ञांना देण्यात आला. या संदर्भात मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत. आणखी वाचा-“विजयाने हुरळू नका”, रवींद्र मिर्लेकर यांचा ठाकरे गटाच्या गटप्रमुखांना सल्ला शहरात सर्वाधिक रुग्ण एक ते २५ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण १३८६ डेंग्यू संशयित रुग्ण आढळले. यातील एक हजार १४ संशयित हे नाशिक शहरातील तर, ३१ मालेगाव महानगरपालिका आणि ३१६ रुग्ण हे ग्रामीण भागातील होते. यातील २९५ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले. यातील सर्वाधिक २५४ रुग्ण नाशिक शहरातील असून मालेगावमध्ये तीन, ग्रामीण भागातील ३४ आणि अन्य जिल्ह्यातील चार रुग्णांचा समावेश आहे. २९३ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. तर नाशिक शहरात एक व ग्रामीणमधील एक अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात ५७ डेंग्यूचे रुग्ण दाखल होते. हे सर्व बरे होऊन घरी गेले.