धुळे : शिवसेनेतील (उबाठा) महिला नेत्या आणि कार्यकर्त्यांवर काळी जादू करण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेत (शिंदे गट) नुकत्याच प्रवेश केलेल्या सौ. शुभांगी पाटील यांच्याविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करण्यात येतो आहे. सौ. पाटील त्यांचा मुलगा, वाहन चालक तसेच अन्य कार्यकर्त्यांनी केलेल्या मोबाईल कॉलची चौकशी व्हावी आणि त्यांच्या विरुध्द अंधश्रध्दा निर्मूलन कायदा, जादुटोणा विरोधी कायदा २०१३ अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आणि तक्रार शिवसेनेच्या (उबाठा) वतीने करण्यात आली.
देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महिला आघाडीच्या नेत्या संगीता जोशी, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, सुनिता शिरसाट , उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी,धिरज पाटील , प्रशांत ठाकूर,संदीप सूर्यवंशी या शिष्टमंडळाने लेखी निवेदन दिले.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात सौ.शुभांगी पाटील या पूर्वी आमच्याच पक्षात उपनेते होत्या. पक्षाने त्यांना पदवीधर मतदार संघ निवडणुकीची उमेदवारी, उपनेते व महिला संपर्क प्रमुख पद देखील दिले होते. त्यांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाने त्यांना मानाची पदे देवूनही त्या अमिषाला बळी पडून शिंदेेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. मात्र त्यांनी प्रतिक्रीया देतांना ‘मी शिवसेना पक्षात जात आहे’ असे वक्तव्य केले. मुळात शिवसेना पक्षाबाबत तसेच आमदार फुटीचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. सौ. शुभांगी पाटील यांनी ‘मुळ शिवसेनेत जात आहे’ असे केलेल्या वक्तव्यावर उबाठा शिवसेनेने आक्षेप घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्या महिला पदाधिकार्यांनी देखील त्याबाबत सोशल मिडीयावर वस्तूस्थितीदर्शक निवेदन केले. एखादी व्यक्ती नेता किंवा पक्षाबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देत असेल तर ती कशी चुकीची आहे याबाबत शिवसेना उबाठा तर्फे स्पष्टीकरण करून भूमिका मांडणे हा घटनेने सर्वांना दिलेला अधिकार आहे.
महिला पदाधिकार्यांना दमबाजी
सौ. शुभांगी पाटील यांनी महिला पदाधिकार्यांना दमबाजी व धमकावण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर ‘यापुढे माझ्या पोस्ट व्हायरल कराल, तर काळी जादू करेल’ अशा शब्दात धमकी दिली. त्यांच्या काही समर्थकांकडून निनावी फोन करुन अर्चाच्च आणि एकेरी भाषेत धमाकावलेजाते आहे. स्वत: सौ.शुभांगी पाटील यांनी नरेंद्र परदेशी यांच्याशी फोनवर हुज्जत घातली. यावेळी ‘तुम्हाला काही चुकीचे वाटत असल्यास तुम्ही कायदेशीर दाद मागा, पण असे फोनवर भांडण करु नका’ असे नरेंद्र परदेशी यांनी त्यांना सांगितले. त्यांच्या मुलाने नरेंद्र परदेशी यांना अनेकदा फोन करुन धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘आम्ही रात्री नरेंद्र परदेशी यांना धडा शिकवणार, त्यांच्या घरी जावू’ असे तेजस सपकाळे यांना सांगितले.ही एकप्रकारे धमकी आहे.
शिक्षिका असूनही…
राजकीय भूमिका मांडणे, पदाधिकारी म्हणून आमचे कर्तव्य आहे. सौ.शुभांगी पाटील शिक्षिकाअसून पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढल्या आहेत. परंतु त्या राजकीय विषयाला गुंडगिरीचे स्वरुप देवून महिला म्हणून त्या अधिक गैरफायदा घेत आहेत.’काळी जादू करेल’ असा दम देण्यात आल्याने पक्षाच्या महिला कार्यकर्त्या धास्तावल्या आहेत व त्या मानसिकदृष्ट्या विचलीत झाल्या आहेत. महिलांना काळ्या जादूची भिती घालण्यात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विवेदन देतेवेळी आण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे, महादु गवळी, सुनिता चौधरी, हिमांशू परदेशी आदी उपस्थित होते.
