जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या आठवडाभरापासून सोने आणि चांदीचे दर दररोज नवीन उच्चांक करताना दिसत आहे. विशेषतः चांदी अल्पावधीत मोठी झेप घेतल्यानंतर तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. वर्षभरात मोठा परतावा देणाऱ्या चांदीमुळे खऱ्या अर्थाने ग्राहकांची चांदी झाली आहे.

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत चांदीच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ चर्चेचा विषय ठरत आहे. बुधवारी तब्बल १८ हजार ५४० रुपयांची मोठी उसळी घेतल्याने चांदीने दोन लाख ९१ हजार ४९० रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. या दरवाढीचा प्रभाव कमी होण्याऐवजी दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. गुरुवारी दिवसभरात आणखी २ हजार ६० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचा दर दोन लाख ९३ हजार ५५० रुपयांच्या नव्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. सलग दोन दिवस झालेल्या या मोठ्या दरवाढीमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत खळबळ उडाली. अवघ्या काही हजार रुपयांच्या फरकावर तीन लाखांचा टप्पा असल्याने आता ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांचे लक्ष चांदीच्या पुढील हालचालींकडे वेधले गेले आहे. चांदी तीन लाखांचा टप्पा कधी गाठते, याबाबत बाजारात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

चांदीच्या दरवाढीचे कारण काय ?

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ-उतार, औद्योगिक मागणी तसेच गुंतवणूकदारांचा वाढता कल यांचा चांदीच्या दरावर थेट परिणाम होत असल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांचे मत आहे. सध्या औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वापर वाढत असून सौरऊर्जा, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांत्रिक उद्योगांमध्ये चांदीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे चांदीच्या दरात सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. दरवाढीचा परिणाम प्रत्यक्ष व्यवहारांवरही दिसून येत आहे. वाढत्या किमतीमुळे काही ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही गुंतवणूकदार आणखी दरवाढीच्या अपेक्षेने खरेदीकडे वळत आहेत. दुसरीकडे चांदीच्या व्यावसायिकांनाही व्यवहार करताना सावध भूमिका घ्यावी लागत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सध्याची तेजी अशीच कायम राहिल्यास चांदी तीन लाखांचा टप्पा सहजपणे गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चांदीचे दर वर्षभरात इतके वधारले

जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत वर्षभरापूर्वी म्हणजे १५ जानेवारी २०२५ रोजी चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो ९३ हजार ७३० रूपयांपर्यंत होती. वर्षभरात सातत्याने दरवाढ झाल्यानंतर चांदीचे दर १५ जानेवारी २०२६ रोजी सुमारे दोन लाख ९३ हजार ५५० रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले. एक वर्षांच्या कालावधीत तब्बल एक लाख ९९ हजार ८२० रूपयांची दरवाढ चांदीत झाली असून, गुंतवणुकदारांना २०० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. गुंतवणुकीच्या हिशेबाने चांदी खरेदी करणाऱ्यांची अक्षरशः चांदी झाली आहे. आगामी काळातही चांदी आणखी वधारण्याची शक्यता गृहीत धरून ग्राहकांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.