जळगाव : नाशिक–त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मध्य रेल्वे प्रकल्प, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, प्रवासी सुविधा आणि प्रशासकीय समन्वय अधिक सक्षम व गतीमान करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या बैठकीत विकास कामांची वेळेत व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करण्याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
नाशिक–त्र्यंबकेश्वर येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सुलभ प्रवासासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजनांवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्याशी संवाद साधला. कुंभमेळ्याच्या कालावधीत अतिरिक्त रेल्वे गाड्यांचे नियोजन, विशेष गाड्या, फलाटांचे व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन सेवा तसेच रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत सखोल चर्चा त्यांनी केली. जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासन यांनी संयुक्त कृती आराखडा तयार करून समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीने यावेळी भर देण्यात आला.
बैठकीत जळगाव जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या विविध नवीन व विस्तारीत रेल्वे मार्गांच्या प्रकल्पांचा आढावा देखील घेण्यात आला. या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी, शेतकरी व जमीनधारकांच्या तक्रारी, तसेच सक्षम प्राधिकारी (भूसंपादन) यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल, यावर चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याचे ठरले. भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता राखून, कायदेशीर अडथळे दूर करून भूसंपादनाची कार्यवाही अधिक गतीमान करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले. रेल्वे प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था सुलभ होऊन औद्योगिक, व्यापारी व कृषी विकासाला चालना मिळणार असल्याने या प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यासाठी जिल्हा प्रशासन, महसूल विभाग व रेल्वे प्रशासन यांच्यात नियमित समन्वय बैठका घेण्याबाबतही ठरले. याशिवाय रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक नियोजन, अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था, रस्ते जोडणी, स्थानिक नागरिकांच्या सोयी-सुविधा तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित बाबींवरही सकारात्मक चर्चा झाली. जिल्हा प्रशासन हे रेल्वे प्रशासनासोबत सातत्यपूर्ण समन्वय राखत सार्वजनिक सुविधा, सुरक्षितता व पायाभूत विकासासाठी कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी घुगे यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीमुळे रेल्वे व जिल्हा प्रशासन यांच्यातील कार्यात्मक समन्वय अधिक भक्कम होऊन महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी व नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

