नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीसाठी गोदा काठावरील रामकुंड आणि आसपासचे घाट दशक्रिया विधी वगळता इतर सर्व प्रयोजनासाठी बंद करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ याच कारणास्तव बंद करण्यात आले. त्र्यंबकेश्वर मंदिरही भाविकांना दर्शनासाठी दोन महिने बंद ठेवण्याचे नियोजन होत आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी काठावर दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभ पर्वास ३१ ऑक्टोबर रोजी १२ वाजून दोन मिनिटांनी अर्थात सिंह राशीत गुरु प्रवेश करतो, त्या मुहूर्तावर प्रारंभ होत आहे. या दिवशी होणारा ध्वजारोहण सोहळा आणि महाआरतीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये तब्बल ३५ हजार कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. यात नाशिकमध्ये रामकाल पथ, राम झुला प्रकल्पासह नवीन घाट, रस्ते व पूल, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आदींचा समावेश आहे. रामकुंड परिसरातील अनेक कामे अर्धवट असून परिसरात खोदकाम आणि मातीचे ढिगारे पडून आहेत.

ध्वजारोहणापूर्वी शक्य ती कामे युद्धपातळीवर करून हा संपूर्ण परिसर कार्यक्रमासाठी सज्ज करण्यासाठी निर्बंधाबाबत निर्णय घ्यावा लागत असल्याचे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले.  हा परिसर एकदम बंद न करता टप्प्याटप्प्याने आणि गरजेनुसार आठ ते दहा तासांसाठी बंद ठेवून आतील कामे, रेखांकन (मार्किंग) आणि स्वच्छतेची कामे करण्यात येणार आहेत.

सहकार्याचे आवाहन

रामकुंड परिसरात सिंहस्थाची कामे सुरू असल्याने आधीपासून काही निर्बंध होते. या परिसराकडे येणारे बरेचसे रस्ते बंद असून चारचाकी वाहनांनाही प्रतिबंध आहे. ध्वजारोहण आणि महाआरती कार्यक्रम होळकर पूल ते टाळकुटेश्वर मंदिर या दरम्यानच्या परिसरात होईल. हा परिसर मोठा असल्याने तेथील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी परिसर बंद ठेवणे आवश्यक असल्याचे कुंभमेळा प्राधिकरण आणि महापालिकेने म्हटले आहे. दशक्रिया विधी वगळता इतर गोष्टींसाठी रामकुंड परिसराचा काही भाग बंद ठेवावा लागेल. जेणेकरून राडारोडा, इतर आवश्यक कामे व स्वच्छता करता येईल. या निर्णयामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. परंतु, ही कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निर्बंध क्रमप्राप्त ठरले. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन खत्री यांनी केले.

स्वच्छतागृह, वस्त्रांतरगृह खुले होणार

ध्वजारोहण तयारीसाठी रामकुंड परिसर व इतर घाटांवर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा ही कामे पूर्ण करण्यासाठी कार्यरत झाली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम या परिसरात होतील. त्यासाठी पायाभूत सुविधांची कामे, अतिक्रमण हटवणे व राडारोडा उचलावा लागणार आहे. नागरिकांना आसनस्थ होण्यायोग्य हा परिसर केला जाईल. ध्वजारोहणापूर्वी या भागातील स्वच्छतागृह आणि वस्त्रांतरगृह खुले केले जाणार आहे. उर्वरित कामे ध्वजारोहणानंतर केले जाणार असल्याचे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले.