नाशिक : विद्यापीठ अधिनियमातील अटी व शर्तींचा भंग केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (एमयुएचएस) पुण्यातील सिंहगड दंत महाविद्यालय आणि रुग्णालयावर मोठी कारवाई केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या महाविद्यालयाच्या पदवी (बीडीएस) आणि पदव्युत्तर (एमडीएस) अभ्यासक्रमाची संलग्नता रद्द करण्यात आली आहे. ​शिक्षकांच्या थकीत वेतनाचा प्रश्न संस्थेने सोडवला नाही. परिणामी, कामबंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याकडे विद्यापीठाने लक्ष वेधले आहे.

​पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे हे सिंहगड दंत महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील ७८ शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या गाऱ्हाणे निवारण समितीकडे दाद मागितली होती. संबंधित कर्मचाऱ्यांचे मे २०१४ पासूनचे वेतन थकीत आहे. मध्यंतरी तीन वर्षांचे मूळ वेतन देताना संपूर्ण वेतनावर प्राप्तिकर वजा करण्यात आला, तसेच एकदा काही महिन्यांचे वेतन देऊन ते परत घेतले गेल्याची तक्रारही कर्मचाऱ्यांनी केली आहे. थकीत वेतनासाठी १० नोव्हेंबर २०२५ पासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. या काळात विद्यापीठाने वारंवार निर्देश देऊनही संस्थेने त्याचे पालन केले नाही. याबद्दल महाविद्यालयावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली होती.

​या प्रकरणात विद्यापीठाने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीने अहवाल सादर केला. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून रुग्णालयीन सेवाही विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. सिंहगड टेक्निकल सोसायटीच्या संचालकांनी आठवडाभरात वेतन अदा करावे, संप मिटल्यानंतर विद्यार्थ्यांचे अतिरिक्त वर्ग घेऊन शैक्षणिक कामकाज नियमित करावे आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचा अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले होते.

​शिक्षकांच्या कामबंद आंदोलनामुळे महाविद्यालयीन रुग्णालय सेवा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावर विपरित परिणाम झाला. महाविद्यालय सध्या अंतर्गत परीक्षा आणि विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेऊ शकत नाही, असे प्राचार्यांनी लेखी स्वरूपात कळवल्याची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विद्या परिषदेच्या बैठकीत चर्चा होऊन सिंहगड दंत महाविद्यालयाचे २०२६-२७ पासूनचे संलग्नीकरण काढून घेण्याचा ठराव संमत करण्यात आला.

​विद्यार्थ्यांचे अन्यत्र स्थलांतर

​या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे राज्यातील इतर खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी स्थलांतर केले जाणार आहे. ही प्रक्रिया विद्यापीठ स्वतः राबविणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे पसंतीक्रम आणि गुणवत्ता लक्षात घेऊन कुलसचिवांमार्फत प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. सिंहगड दंत महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द झाले असले, तरी आस्थापनेवरील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्याची जबाबदारी संस्थेवरच राहील. ही संपूर्ण थकबाकी दिल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच महाविद्यालयाच्या भविष्यातील संलग्नीकरणाबाबत विचार केला जाईल, असे विद्यापीठाने ठरावात स्पष्ट केले आहे.