नाशिक – झपाट्याने औद्योगिक विकास होत असलेल्या सिन्नर तालुक्यासमोर एकाचवेळी कामगार टंचाई, डिझेल-पेट्रोल दरवाढ, डिझेल टंचाई आणि अपुऱ्या मूलभूत सुविधांचे संकट कोसळण्याच्या मार्गावर आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्याने गावी गेलेले अनेक परप्रांतीय कामगार परतले नाही. परिणामी, मुसळगाव, माळेगाव तसेच गुळवंच एमआयडीसीत उद्योगांना नियमित पाळ्यांमध्ये कपात करण्याची वेळ ओढावली. इंधन टंचाईची झळ उत्पादन प्रक्रियेला बसत आहे.
एप्रिल-मे महिन्यात लग्नसराई, शेतीची कामे आणि गावाकडील मुक्कामामुळे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावी गेले. वाढती महागाई, वाढलेला प्रवास खर्च आणि परप्रांतीय कामगारांना गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्याने अनेक कामगार माघारी परतलेच नाहीत. सीमा संघटनेने दोन महिन्यांपूर्वी तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाच किलोचे गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उद्योजकांकडून करण्यात येत आहे. कामगार टंचाईमुळे मुसळगाव व माळेगाव एमआयडीसीतील अनेक उद्योग तीन पाळ्यांऐवजी एक किंवा दोन पाळीत चालवावे लागत आहेत. काही ठिकाणी उद्योग मालक आणि व्यवस्थापकांनाच यंत्रावर काम करण्याची वेळ आली. ऑटोमोबाईल, पॅकिंग, फॅब्रिकेशन, वेअरहाउस, लॉजिस्टिक, बांधकाम आणि वाहतूक क्षेत्रात परिस्थिती गंभीर बनली आहे.
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा थेट फटका कामगार वर्गालाही बसत आहे. कामगारांच्या येण्या-जाण्याचा खर्च वाढल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला असून त्याचा परिणाम उद्योगांतील उपस्थितीवर होत आहे. गुळवंच एमआयडीसीतील मूलभूत सुविधांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाणी पुरवठा, रस्ते आणि इतर सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसल्याने अनेक उद्योजकांचे प्रकल्प रखडले. माळेगाव ते गुळवंच एमआयडीसी जलवाहिनीचे काम दोन्ही बाजूंनी पूर्ण झाले असताना सिन्नर शहरातील अवघ्या २०० मीटर जलवाहिनीचे काम कित्येक महिन्यांपासून रखडलेले आहे. नगरपालिका आणि एमआयडीसी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उद्योगांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली. उद्योजकांना वारंवार कर्जाचे पुर्नमंजुरीकर करावे लागत असून नवीन गुंतवणूकदार साशंक झाले आहेत. सिन्नरच्या औद्योगिक विकासासमोर तिहेरी संकट उभे राहिले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अन्यथा औद्योगिक प्रगतीला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
इंधनाअभावी उत्पादन प्रक्रियेवर परिणाम
पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. कच्चा माल आणि तयार माल वाहतुकीचा वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढले असून उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक उद्योगांना डिझेलवर जनरेटर चालवावे लागत असून त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यात डिझेल टंचाईमुळे वेळेवर इंधन उपलब्ध होत नसल्याने उत्पादन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.
सिन्नरमध्ये उद्योग झपाट्याने वाढत असले तरी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उद्योग क्षेत्र अडचणीत आले आहे. कामगार टंचाई, इंधन दरवाढ, डिझेल टंचाई आणि गुळवंच एमआयडीसीतील अपुऱ्या सुविधा या प्रश्नांवर तातडीने तोडगा न काढल्यास उद्योगांचे मोठे नुकसान होईल. स्थानिक रोजगार निर्मिती व कौशल्य विकासाला चालना देणे अत्यावश्यक आहे. – बबनराव वाजे (सचिव, सीमा संघटना)
