नाशिक – सिन्नर एमआयडीसी परिसरातील महावितरणच्या अनियमित आणि अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक अडचणीत आले आहेत. दिवसातून चार ते पाच वेळा वीज पुरवठा खंडित होत असून, एकही दिवस अखंडित वीज पुरवठा मिळत नाही. या सततच्या त्रासामुळे औद्योगिक क्षेत्रात असंतोष आहे. वीज भार मंजूर होऊ न शकल्याचा परिणाम नवीन उद्योग आणि उद्योग विस्तारावर होत आहे. याप्रश्नी त्वरीत उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (सीमा) दिला आहे.
वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने उत्पादन प्रक्रिया विस्कळीत होत आहे. उद्योगांना दररोज लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक उद्योगांमध्ये यंत्रणा अचानक बंद पडल्याने कच्चा माल, तयार माल तसेच यंत्रसामग्रीचे नुकसान होऊन मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.
महावितरणने मोठा गाजावाजा करुन नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) उपलब्ध करून दिले होते. तथापि, रोहित्र कार्यान्वित करण्यापूर्वी आवश्यक तांत्रिक चाचण्या न केल्याने त्याच्यात दोष आढळून आला. परिणामी, रोहित्र वापरात आणता आले नाही. आणि ते परत पाठवावे लागले. पूर्वतपासणीशिवाय रोहित्र बसविण्याचा हा प्रकार महावितरणच्या निष्काळजी व असमर्थ कारभाराचे द्योतक असल्याची भावना उद्योजकांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, सीमा संघटनेने महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून अखंडित व विश्वासार्ह वीज पुरवठा सुनिश्चित करावा, सर्व अतीभार रोहित्रांची क्षमता वाढवावी तसेच नवीन वीजभार मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी सीमाने केली आहे.
नवीन गुंतवणूक, उद्योग विस्तार अडचणीत
एमआयडीसीतील बहुसंख्य रोहित्र सध्या क्षमतेपेक्षा अधिक भारावर कार्यरत असल्याने ‘ट्रिपिंग’च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नवीन उद्योगांना तसेच विस्तार करणाऱ्या कंपन्यांना आवश्यक वीजभार मंजूर न होऊ शकल्याने कोट्यवधी रुपयांचे गुंतवणूक प्रकल्प अडचणीत आले आहेत. लाखो रुपये खर्च करून विस्तार केलेल्या अनेक कंपन्या अपुऱ्या वीजभारामुळे उत्पादन सुरू करू शकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सिन्नर एमआयडीसीमध्ये नवीन उद्योगांच्या आगमनासाठी अखंडित, पुरेसा वीजपुरवठा अत्यावश्यक असताना, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे औद्योगिक विकासालाच अडथळा निर्माण होत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसत असून, काही उद्योजकांनी झालेल्या नुकसानीची भरपाई महावितरणने द्यावी, अशी मागणीही केली आहे.
