नाशिक – जिल्ह्यात ११ नगरपरिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत रविवारी मतमोजणी झाली. नाशिक जिल्ह्यात महायुतीतच सर्वत्र संघर्ष पाहण्यास मिळाला. विरोधकांना केवळ सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत यश मिळण्याची आशा होती. सिन्नर हे शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार राजाभाऊ वाजे यांचे गाव असल्याने आणि त्यांची चांगली प्रतिमा असल्याने सिन्नर नगरपरिषदेत ठाकरे गट बाजी मारेल, असे म्हटले जात होते.

त्यातच ही निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्यासाठीही प्रतिष्ठेची होती. माजी खासदार हेमंत गोडसे यांनीही शिवसेना शिंदे गटाकडून प्रचारात झोकून देत ही निवडणूक मान-सन्मानाची केली होती. या निवडणुकीतील निकाल आश्चर्यकारक लागले.

सिन्नर येथे राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप, उध्दव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात सामना झाला. याठिकाणी अजित पवार गटाचे ॲड. माणिकराव कोकाटे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे, भाजपचे हेमंत वाजे, शिवसेना शिंदे टाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांची प्रतिष्ठा पणास लागली.

याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभा घेतल्याने अखेरच्या टप्प्यात निवडणुकीला रंग भरला होता. या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उध्दव ठाकरे गट हे स्वतंत्रपणे मैदानात उतरले. निवडणूक जाहीर झाल्यावर मागील विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लढवून सिन्नर नगरपरिषदेसाठी मात्र भाजपमध्ये प्रवेश केलेले उदय सांगळे आणि शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले हेमंत वाजे यांच्या पक्षबदलू भूमिकेमुळे त्यांना डिवचण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वतीने निष्ठावंत मेळावा घेण्यात आला होता.

या मेळाव्यात खासदार राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटाशी किती निष्ठावान आहेत, हे बिंबविण्यासाठी नाशिकचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे प्रदेश पदाधिकारी वसंत गिते यांचे भाषण चांगलेच गाजले. खासदार राजाभाऊ वाजे यांना सत्ताधारी भाजपकडून पक्ष बदलण्यासाठी १०० कोटी रुपये आणि केंद्रात राज्यमंत्रीपद अशी ऑफर देण्यात आली होती.

परंतु, ती त्यांनी धुडकावून लावली. पाठीत खंजीर खुपसायचा, विकृत बुद्धी कशी असू शकते ? ज्या कुटुंबाने सिन्नरसाठी आपले सर्वस्व वाहिले, त्यांना त्रास दिला जात आहे, असे वसंत गिते यांनी नमूद केले. सिन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिल्याचा संदर्भ वसंत गिते यांच्या टिकेला होता.

सिन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा झाल्या असताना शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ राज्यस्तरीय एकाही नेत्याची प्रचार सभा झाली नाही.

अशा या सिन्नर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विठ्ठल उगले यांनी विजय मिळविला. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमोद चोथवे यांचा त्यांनी पराभव केला. चोथवे यांना ९ हजार ३०२ मते मिळाली. तर उगले यांना १४ हजार ९०४ मते मिळाली. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमंत वाजे यांना ४ हजार ८५९, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नामदेव लोंढे यांना ७ हजार २६२ मते मिळाली. सिन्नर नगराध्यक्षपद निवडणुकीतील पराभव खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. अजित पवार गटाचे विठ्ठल उगले यांच्या प्रचारात माजी मंत्री ॲड. माणिक कोकाटे शेवटच्या क्षणी उतरले होते. परंतु, त्यांची कन्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी प्रारंभापासून प्रचाराची सूत्रे हाती घेतली होती.