नाशिक : सिन्नर शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात हे दोघे संशयित सुरुवातीला मुंबई व सुरत येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ते सिन्नरमध्ये आले असून, सुमारे एका वर्षापासून ते शहरात राहत असल्याची माहिती पुढे आली आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी जिल्ह्यातील हॉटेल, लॉज तसेच इतर ठिकाणी संशयित व्यक्ती आणि अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत सिन्नर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती. सिन्नर शहरातील पांडवनगरी परिसरातील श्रुती अपार्टमेंटमध्ये एक पुरुष व एक महिला संशयास्पदरीत्या आपली खरी ओळख लपवून राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला.
कारवाईदरम्यान फ्लॅटमध्ये एक पुरुष व एक महिला आढळून आले. प्रारंभी त्यांनी आपली नावे मिलन सुलतान सरदार आणि वर्षा सुलतान शेख (रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी सांगितली. पोलिसांनी त्यांच्याकडे आधारकार्डची मागणी केली असता त्यांनी सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद वाटली. तसेच दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना चौकशीसाठी सिन्नर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान दोघांनी आपण बांगलादेशचे नागरिक असल्याची कबुली दिली.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे मिलन सुलतान सरदार (वय ३४, रा. जामरोल डंगा-७५००, सरदारवाडी, वॉर्ड क्र. ६, ता. कालिया, जि. नराईल, बांगलादेश) आणि बोरशा सुलतान मुनीर शेख ऊर्फ शिवली खानम हबीबउर रहमान रुबेल (वय ३३, रा. माधवपाशा, डाकघर हिदीया-९२१०, ता. कालिया, जि. नराईल, बांगलादेश) अशी आहेत. मुंबई व सुरत येथे वास्तव्यानंतर ते सिन्नरमध्ये आले होते. नाशिक शहरातील काही हॉटेलमध्ये ते स्वयंपाकी म्हणून काम करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एस., उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या आदेशान्वये पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार दांडेकर यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे, आप्पासाहेब काकड, विलास बिडगर तसेच महिला पोलीस अंमलदार रूपाली डुंबरे यांनी सहभाग घेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
बनावट आधारकार्ड, वाहन परवाना जप्त
झडतीदरम्यान संशयितांकडून भारतात वास्तव्यास राहण्यासाठी तयार करण्यात आलेले बनावट आधारकार्ड, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), सिमकार्ड आणि डेबिट कार्ड जप्त करण्यात आले. तसेच त्यांच्याकडे भारतात कायदेशीर वास्तव्यासाठी आवश्यक असलेला पासपोर्ट, व्हिसा अथवा अन्य कोणताही वैध परवाना आढळून आला नाही. पोलिसांनी दोघांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, त्यांना देशाबाहेर पाठविण्याची (निर्वासनाची) आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
