नाशिक – अटकेतील संशयितास लवकरात लवकर जामीन होण्यासाठी तसेच दोषारोपपत्र दाखल करताना प्रकरण सौम्य करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानेे रंगेहात पकडले. महत्वाची बाब म्हणजे संशयित अधिकाऱ्याने पोलीस ठाण्याच्या आवारात लाचेची रक्कम स्वीकारली. या कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राजू ब्रिजलाल पाटील (४२, एमआयडीसी पोलीस ठाणे, सिन्नर) असे संशयित पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात त्यास अटक करण्यात आली आहे.

या दाखल गुन्ह्याच्या अनुषँगाने मुलाला वाढीव पोलीस न मागण्यासाठी आणि संशयिताला लवकरात लवकर जामीन होण्यासाठी तपासात सहकार्य करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील यांनी एक लाख ६० हजार रुपयांची लाच मागितली. दोषरोपपत्र दाखल करताना हे प्रकरण सौम्य करण्याची तयारी दर्शविली गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तडजोडीअंती एक लाख रुपये लाचेची रक्कम निश्चित झाली. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नाशिकच्या पथकाने सापळा रचला. सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील हे एक लाख रुपये तक्रारदाराकडून स्वीकारत असताना पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने पोलीस दलाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ यांनी काम पाहिले. तर सापळा पथकात पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके, योगेश शिंदे यांचा समावेश होता. दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी १०६४ या टोल फ्री क्रमांकासह, ०२५३-२५७५६२८, २५७८२३० तसेच ९९३०९९७७००, ९५४५०३१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.