नाशिक – ​सिन्नर येथील खासगी औष्णिक वीज प्रकल्पासाठी लावलेल्या बोलीनुसार ३,८०० कोटी रुपये भरल्यानंतर या प्रकल्पाची अधिग्रहण प्रक्रिया आता पूर्णत्वास गेली आहे. राज्य सरकारची महानिर्मिती (महाजनको) आणि सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) यांनी भागीदारीतून हे अधिग्रहण केले आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील १३५० मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हा औष्णिक वीज प्रकल्प आहे. प्रारंभी ‘इंडियाबुल्स’ आणि नंतर तो ‘रतन इंडिया पॉवर’ कंपनीकडे होता. या प्रकल्पाची थकबाकी न भरल्यामुळे कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. त्यानंतर झालेल्या लिलाव प्रक्रियेत महानिर्मिती आणि एनटीपीसीने एकत्रितपणे ३,८०० कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावून हा प्रकल्प आपल्या ताब्यात घेतला. यासंदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आता त्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

​अधिग्रहणानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या प्राथमिक कामांना सुरुवात झाली असून, येत्या सहा ते आठ महिन्यांत २७० मेगावॉट क्षमतेचे दोन संच सुरू करण्याचा मानस आहे. उर्वरित तीन संच पुढील दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत कार्यान्वित करण्यात येतील, अशी माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

​या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या वीज प्रणालीत विश्वासार्ह ‘बेस-लोड’ क्षमतेची भर पडणार आहे. प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. पुनरुज्जीवन, अंमलबजावणी आणि कार्यान्वयन टप्प्यांमध्ये अभियंते, तांत्रिक कर्मचारी, कुशल व अकुशल कामगार, कंत्राटदार तसेच सहाय्यक सेवा पुरवठादारांना मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध होईल. यासोबतच नाशिक परिसरातील पूरक व संबंधित उद्योगांच्या वाढीस चालना मिळून प्रादेशिक सामाजिक-आर्थिक विकासास हातभार लागणार असल्याचे महानिर्मितीने म्हटले आहे.

दिल्लीतील एनटीपीसी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास महानिर्मितीकडून संचालक (प्रकल्प) अभय हरणे, संचालक (वित्त) मनेष वाघीरकर, मुख्य अभियंता (प्रकल्प व नियोजन) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल सोनजे, महाव्यवस्थापक (लेखा) संदेश मोरे, मुख्य कंपनी सचिव राहुल दुबे, अधीक्षक अभियंता (प्रकल्प व नियोजन) प्रवीण भोये, उपकार्यकारी अभियंता (प्रकल्प व नियोजन) अभिजीत मते उपस्थित होते. तर एनटीपीसीकडून संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन, संचालक (संचलन) रविंदर कुमार, संचालक (प्रकल्प) के. सुंदरम, महाव्यवस्थापक (व्यापार विकास) अजयकुमार चतुर्वेदी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

क्षमताविस्तार…

​या अधिग्रहणामुळे महानिर्मितीची औष्णिक वीज निर्मिती क्षमता १०,२०० मेगावॉटवरून ११,५५० मेगावॉटपर्यंत वाढणार आहे. परिणामी, औष्णिक, वायू, सौर व जलविद्युत प्रकल्पांचा समावेश होऊन महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता १५ गिगावॉटपेक्षा (१५,००० मेगावॉट) अधिक होईल. यामुळे महाराष्ट्र राज्याची ऊर्जा सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे.