नाशिक – भोंदूबाबा अशोक खरात विरुद्ध महिला लैंगिक शौषण प्रकरणी एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करावे लागते. पहिला गुन्हा १७ मार्च रोजी दाखल झाला होता. उर्वरित गुन्हे त्यानंतर आठवडाभरात दाखल झाले. पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटीकडे तपास तीन दिवसानंतर म्हणजे २० मार्च रोजी आला. या सर्वाचा विचार करता या सर्व गुन्ह्यांचा स्वतंत्रपणे तपास ४० ते ४५ दिवसांत पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्याचे आव्हान विशेष तपास पथकासमोर आहे.

भोंदूबाबा अशोक खरातविरोधात दाखल लैंगिक शोषण व फसवणुकीच्या नऊ गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करीत आहे. याशिवाय खरात विरुद्ध नसलेल्या मात्र या विषयांशी संबंधित दोन गु्न्ह्यांचा तपासही एसआयटीमार्फत होत आहे. लैंगिक शोषण प्रकरणी दाखल प्रत्येक गुन्ह्याचा तपास मुदतीत, पुरावे गोळा करून करण्याचा एसआयटी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे या पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी आणि अमोल भारती उपस्थित होते. खरात विरूद्ध पहिल्या गुन्हा दाखल होऊन २० दिवस होऊन गेले. सर्व गुन्ह्यांच्या तपास ४० ते ४५ दिवसांत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सातपुते यांनी नमूद केले. पीडिता धाडस दाखवून समोर आल्याने खरातविरोधात कारवाई करता आली. त्यांची ओळख उघड न करणे हे सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे. पीडितांना मनस्ताप होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन सातपुते यांनी केले.

आतापर्यंतच्या तपासात ३० पेक्षा अधिक साक्षीदार आणि तक्रारदारांकडून माहिती घेतली. तपासात अजूनपर्यंत खरातचा कोणी सहआरोपी आढळलेला नाही. पुढील काळात तशी माहिती व पुरावे मिळाल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. भारतीय राज्य घटनेत वैज्ञानिक दृष्टीकोन व चौकस बुद्धीचा विकास हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे. या निमित्ताने भविष्यात अंधश्रध्देपोटी महिलांचे शोषण घडू नये आणि समाजाने भोंदूच्या फसवणुकीस बळी पडू नये. यासाठी सतर्क व चौकस राहण्याचे आवाहन सातपुते यांनी केले.

तपासात काय समोर आले ?

भोंदूबाबा खरात पीडिता आणि कुटुंबाच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन भीती दाखवून, खडे, चिंचुके, रुद्राक्ष, पूजा विधी आदींच्या माध्यमातून पैसे उकळत होता. महिलांना स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचे भासवून कुटुंबियांना मृत्यूची भीती दाखवून तसेच बदनाम करण्याची धमकी देऊन त्यांचे लैंगिक शोषण करीत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. तसेच ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात, हातचलाखीने स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचे भासवून समाजात सातत्याने अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करीत होता.