नाशिक – शिवाजी नगरजवळील फाशीचा डोंगर परिसरात दोन जणांना मारहाण करुन लूट करणाऱ्या सहा संशयितांना गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले. अंगावरील सोन्याची साखळी, अंगठी, भ्रमणध्वनी, घड्याळ, रोख रक्कम बळजबरीने काढुन घेणाऱ्या इसमांना अटक करून त्यांच्याकडून चार लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेतले.

सातपूर परिसरात शिवाजीनगर आहे. फाशीचा डोंगर परिसरात यश कोठावदे आणि त्यांचा मित्र वैभव हे मोटारीने गेले होते. रस्त्याच्या कडेला मोटार उभी करुन ते थांबले असताना तीन दुचाकींवर बसून आलेल्या सहा संशयितांनी त्यांना दमदाटी केली. यश यांना मारहाण करुन मोटारीवर दगड टाकून त्यांच्याकडील सोन्याची साखळी, अंगठी, भ्रमणध्वनी, घड्याळ, रोख रक्कम हिसकावून घेतली. यश यांच्या भ्रमणध्वनीवरून फोन पे, ॲपद्वारे आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न संशयितांनी केला. मात्र तो सफल झाला नाही. या लुटीसंदर्भात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक माहिती घेवून संशयिताचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवला असता तो यश रणधीर याच्या नावावर असल्याचे दिसले. त्याचा अंबड पोलीस ठाणे हद्दीत शोध घेतला असता तो फरार झाला. संशयित उल्हासनगर आणि नंतर मालेगाव येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा >>>सहावीतील विद्यार्थिनीचा चक्कर येऊन मृत्यू

पोलिसांना मालेगाव कलेक्टर पट्टा परिसरात सापळा रचल्यावर भूषण गोलाईत (१९), कृष्णा दळवी (२०, रा. सिडको) हे पोलिसांच्या ताब्यात सापडले. त्यानंतर चार संशयित पंचवटी तसेच तपोवन परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून नीलेश कुमावत (२१, रा. पवननगर), आदिल खाटीक (२०, रा. तोरणा नगर), यश उर्फ सोनु रणधीर (१९, रा. कामटवाडा), चंदु आवळे (१९, रा. वनश्री कॉलनी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याची लगड, सोन्याची अंगठी, तीन दुचाकी, भ्रमणध्वनी, घड्याळ असा चार लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील नीलेश कुमावत, भूषण गोलाईत हे सराईत गुन्हेगार आहेत.