कुस्तीपटू नरसिंग यादव प्रमुख पाहुणा

तिसरी राष्ट्रीय व आठवी राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धा रविवारी होत असून, यंदा या स्पर्धेत देशभरातील काही दिग्गज धावपटूंसह तब्बल सहा हजार खेळाडू सहभागी होण्याची संयोजकांना अपेक्षा आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू नरसिंग यादव यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. ब्राझीलमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीमुळे नाशिकच्या कविता राऊतसह काही धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. खुल्या गटासाठीचा सुमारे ४२ किलोमीटरचा धावण मार्ग गंगापूर धरणाच्या भिंती मार्गावरून नेण्याच्या आलेल्या सूचनेवर संयोजक विचार करत आहे. या संदर्भात पुढील दोन ते तीन महिन्यांत अभ्यास करून आवश्यक त्या परवानग्यांबाबत चाचपणी करण्यात येईल. त्यात सकारात्मकता दिसल्यास पुढील वर्षीच्या स्पर्धेवेळी हा मार्ग बदलण्याचा विचार केला जाणार आहे. समाजात आरोग्याविषयी सजगता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये खेळण्यासोबत पळण्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने प्रारंभी संस्थांतर्गत सुरू झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेचे व्यापकत्व कालांतराने वाढत गेले. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरच्या धर्तीवर आयोजिलेल्या स्पर्धेची तयारी पूर्णत्वास गेल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी सकाळी सात वाजता स्पर्धेला गटनिहाय सुरुवात होईल. उद्घाटन सोहळ्यास अंजू बॉबी जॉर्ज उपस्थित राहणार होती, परंतु काही कारणास्तव त्या उपस्थित राहू शकणार नसल्याने ऐनवेळी कार्यक्रमात बदल करावे लागले. स्पर्धेसाठी ‘गुलशन’ या बोधचिन्हाचे अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वर्षी स्पर्धा विविध १६ गट सहभागी होणार असून विजेत्या खेळाडूंना एकूण सात लाख १४ हजार ५०० इतक्या रकमेची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे.

स्पर्धेत आठ गट हे संस्थांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असून सहा गट महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ांतील व नाशिक जिल्ह्य़ातील खेळाडूंसाठी खुले आहेत. स्पर्धेतील सर्वच गटांच्या नोंदणीसाठी संकेतस्थळावर व्यवस्था करण्यात आली. आतापर्यंत मविप्र मॅरेथॉनमधील गतवेळचा विजेता पारसकुमार, २०१४ मधील विजेता सूर्यकांत पेहरे, अमरजित पाल सिंग, नीरज पाल सिंग, गिरीश तिवारी, मोनिका आथरे, दुर्गा देवरे अशा एकूण १३ राज्यांतील धावपटूंनी सहभागी होण्याचे मान्य केले आहे. खुल्या राष्ट्रीय गटातील विजेत्यांना साडेतीन लाखांहून अधिकची पारितोषिके दिली जातात. मुंबई व देशातील इतर शहरांतील मॅरेथॉनच्या तुलनेत नाशिकच्या स्पर्धेत पारितोषिकाची रक्कम मोठी नसल्याने दिग्गज खेळाडू येण्याचे टाळतात या प्रश्नावर पुढील वर्षी बडय़ा उद्योगांचे प्रायोजकत्व मिळवून हा प्रश्न सोडविला जाणार असल्याचे पवार यांनी नमूद केले.

स्पर्धेत पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन आणि महिला व पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉनसाठी ‘आरएफआयडी’ संगणक चिपचा वापर केला जाईल. आंतरराष्ट्रीय निकषानुसार पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेसाठी आठ ‘रिफ्रेशमेंट पॉइंट’ राहतील. स्पर्धेसाठी ४६० क्रीडा शिक्षकांची पंच, पायलट व तांत्रिकी व इतर समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गतवेळी प्रमुख खेळाडूंपुढे पायलट राहत असल्याने मागून येणाऱ्यांना काही अडचणींना तोंड द्यावे लागले होते. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक किलोमीटरला मार्गदर्शक कार्यरत राहतील.

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध वेशभूषेतील लहान मुलांचे गट या मार्गावर राहतील. शिवाय वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरातून येणाऱ्या खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था करण्यात आल्याचे पवार यांनी नमूद केले.

स्पर्धेतील गटनिहाय अंतर

खुला गट पुरुष (४२.१९५ किलोमीटर), पुरुष आणि महिला अर्ध मॅरेथॉन (२१.०९७), वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी (१२), ४५ वयापुढील पुरुष (१२), कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी (१०), इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थी (पाच), इयत्ता पाचवी ते सातवी विद्यार्थी (४), इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थिनी (४), इयत्ता पाचवी ते सातवी विद्यार्थिनी (३), वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनी (६), ६० वर्षांवरील ज्येष्ठांचा गट (४), १८ वर्षांखालील मुले खुला (६) आणि १८ वर्षांखालील मुली खुला (५ किलोमीटर)

स्पर्धेचा मार्ग : गंगापूर रस्त्यावरील मविप्र मॅरेथॉन चौक, जुना गंगापूर नाका, विद्या विकास चौक, आनंदवली, सोमेश्वर, हॉटेल गंमतजंमत, दुगांव फाटा, गिरणारे, धोंडेगाव व परत मविप्र मॅरेथॉन चौक