जळगाव : जिल्ह्यात तीव्र विरोधानंतरही आतापर्यंत सुमारे २.७५ लाख घरगुती वीज ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी मीटर लावण्यात आले आहेत. दरम्यान, पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट मीटर बिनधास्तपणे बसवा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. या मीटरमुळे अचूक बिलिंग होणार असून, दिवसा वीज वापरावर मोठी सवलत दिली जात आहे. परिणामी, ग्राहकांचे बिल आपोआप कमी होणार असल्याचा दावा देखील पालकमंत्री पाटील यांनी केला आहे.

धरणगाव उपविभागातील बोरगाव बुद्रुक येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ अंतर्गत उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तीन मेगावॅट क्षमतेचा सदर सौर प्रकल्प धरणगाव तालुक्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाद्वारे निर्माण होणारी वीज प्रामुख्याने कृषी पंपांना पुरवली जाणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

राज्य शासन शेतीला दिवसा वीज देण्यास कटिबद्ध आहे. पारंपरिक ऊर्जेवरील ताण कमी करून अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे हा सरकारचा उद्देश आहे. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण संरक्षणासही हातभार लागणार असून, भविष्यातील ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी हा शाश्वत पर्याय ठरणार आहे, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.

स्मार्ट मीटर ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली असून, यातून वीज वापराची माहिती थेट केंद्रीय यंत्रणेला पाठविली जाते. त्यामुळे मीटर रीडिंगमध्ये मानवी हस्तक्षेप कमी होतो आणि चुकीच्या बिलाची शक्यता जवळपास संपुष्टात येते. स्मार्ट मीटर प्री-पेड नाहीत, तर पोस्टपेडच आहेत. त्यामुळे ग्राहकांना आधी पैसे भरावे लागतील, ही भीती निराधार आहे.

मीटरमुळे बिल दुप्पट येते, हा केवळ गैरसमज आहे, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरावर प्रतियुनिट ८० पैसे ते एक रुपया सवलत दिली जात आहे. यामुळे ग्राहकांना आर्थिक लाभ होणार आहे. दिवसा वीज वापर वाढविल्यास रात्रीच्या वेळचा ताण कमी होतो.

आणि वितरण व्यवस्थेवरचा दबाव घटतो. ही योजना ग्राहक आणि वीज वितरण कंपनी दोघांसाठीही फायदेशीर आहे.गैरसमज आणि अफवांमुळे विकास कामांना अडथळा येऊ देऊ नका. स्मार्ट मीटरमुळे अचूक बिल आणि बचत हीच वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सर्वांनी पुढाकार घेऊन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. स्मार्ट मीटर बसविण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.