नाशिक – महावितरणकडून ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याचे किती लाभ होतात, वीज देयक कमी होण्यात कशी मदत होते, यासंदर्भात प्रबोधन करण्यात येत असले तरी ग्राहकांमधील साशंकता दूर होण्यास तयार नाही. त्यातच स्मार्ट मीटरसंदर्भातील काही शंकांमुळे ग्राहक सावधगिरी बाळगत आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरासह तालुक्यात स्मार्ट मीटर बसविलेल्या ग्राहकांना एक समस्या सध्या भेडसावत आहेत. वीज देयक न भरल्याने ही समस्या उदभवली असून त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

महावितरणकडून किती परिमंडळात किती ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविले, त्याची आकडेवारी दिली जात असली तरी अजूनही बहुसंख्य ग्राहक स्मार्ट मीटर बसविण्यास तयार नाहीत. त्यांच्या मनात काही शंका आहेत. वीज कंपनीने मागील वर्षी दिंडोरी शहरासह तालुक्यात स्मार्ट मीटर बसविले. काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यास ग्राहक तयार झाले नाहीत. काही ठिकाणी ग्राहकांनी सहकार्य केले. ज्या ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविले, त्यांंना मीटरच्या स्वयंचलित यंत्रणेमुळे मोठा फटका बसला. वीज देयक न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला. वीज पुरवठा बंद झाल्याने प्रारंभी ग्राहकांना काहीच समजेनासे झाले.

वीज पुरवठा खंडित होण्याचे काही वेगळे कारण असेल, असे त्यांना वाटत होते. कारण स्मार्ट मीटरमध्ये वीज पुरवठा होत असल्याचे लाईट दिसत होते. काही ग्राहकांनी वीज कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. काहींनी वीज तंत्रज्ञांना बोलावून तपासणीही केली. परंतु, इतके करुनही वीज पुरवठा खंडित होण्याचे उत्तर त्यांना मिळाले नाही. स्मार्ट मीटरची स्वयचलित यंत्रणा कार्यान्वित झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचे समजले. वीज देयक थकल्यास स्मार्ट मीटरमध्ये वीज पुरवठा तत्काळ बंद होण्याची सुविधा असल्याचे समजते.

ज्यांनी तातडीने भ्रमणध्वनीवरुन स्मार्ट मीटर क्रमांक टाकून वीज देयक भरले, त्यांचा वीज पुरवठा थोड्या वेळात पुन्हा सुरू झाला. परंतु, ज्यांना त्वरीत पैसे भरणे जमले नाही, त्यांची रात्र अंधारातच गेली.शनिवारी हा प्रकार घडला. त्यामुळे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान वीज कंपनीने स्मार्ट मीटरच्या स्वयंचलित यंत्रणेबाबत तातडीने सर्व तपशीलवार माहिती वीज ग्राहकांना देण्याची गरज व्यक्त होत आहे.
नुकताच नंदुरबार जिल्ह्यातही स्मार्ट मीटर प्रणालीमुळे शासकीय कार्यालयांनाही अडचणींना तोंड द्यावे लागले.

शहादा तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयाची केवळ ४,३५० रुपये वीज देयक थकबाकी राहिल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. परिणामी, या कार्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाले. स्मार्ट मीटर प्रणालीमध्ये दोन महिन्यांचे देयक थकित राहिल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होण्याची तरतूद आहे. या नियमातून शासकीय कार्यालयांनाही सवलत मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ चार हजार रुपयांचे देयक वेळेत न भरल्याने एवढ्या महत्त्वाच्या कार्यालयाचा वीज पुरवठा बंद झाला. स्मार्ट मीटरसंदर्भातील ही बाजूही ग्राहकांना सांगण्यात यावी, असा आग्रह धरला जात आहे.